मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आश्वासन दिल्यानंतरही उपेक्षाच

वर्धा : सेवाग्राम आश्रमाचा जागतिक वारसा स्थळात समावेश करण्याबाबत खुद्द मुख्यमंत्र्यांनी हमी दिली होती. परंतु, अद्याप नामांकन प्रक्रियेला प्रारंभ झालेला नाही. १८ एप्रिलला जगभर जागतिक वारसा दिन साजरा केला जातो. त्या निमित्ताने हा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे.

सेवाग्रामचा समावेश जागतिक वारसा स्थळात करण्याबाबत बहार या पर्यावरणप्रेमी संस्थेने दोन वर्षापूर्वी पंतप्रधानांना पत्र पाठवून मागणी केली होती. तसेच गतवर्षी महात्मा गांधी जयंतीदिनी आयोजित सेवाग्राम विकास आराखड्याच्या  ई-लोकार्पण सोहळ्यात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीही समावेशासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली होती. या प्रश्नाावर लक्ष वेधण्यासाठी बहारने ह्यवारसा ते वारसाह्ण अशी सेवाग्राम आश्रम ते लोणार सरोवर सायकल यात्रा गतवर्षी फेबु्रवारीत काढली. विशेष म्हणजे, लोणार सरोवराचा वारसास्थळात नुकताच समावेशही झाला आहे.

या पार्श्वभूमीवर ही नामांकन प्रक्रिया राज्य शासनाने लवकरात लवकर मार्गी लावण्याची विनंती बहारने केली आहे. जागतिक वारसास्थळांची नियमावली युनेस्कोद्वारे तयार केली जाते. ज्या स्थळाचा समावेश जागतिक वारसास्थळ यादीत करायचा आहे, त्याचे आधी नामांकन मिळवावे लागते. ही नामांकनाची नश्ती भारत सरकार युनेस्कोकडे पाठविते. राज्य सरकार अशी नश्ती तयार करून केंद्र शासनाला सादर करू शकते. नामांकनाची नश्ती तयार करणे हे अतिशय क्लिष्ट व व्यापक स्वरूपाचे काम आहे. वारसास्थळाच्या सीमा, त्याचे निकष, मालकी वर्णन, समग्र इतिहास, आता पर्यत झालेले बदल, नकाशा, संभाव्य वारसास्थळाच्या वैश्विक मूल्याची पुराव्यासह मांडणी व अन्य बाबी त्यात असतात. तसेच आजतागातय घोषित करण्यात आलेल्या इतर स्थळांची तुलना करून तसे तौलनिक विश्लेषन सादर करावे लागते. ही व्यापक प्रक्रिया संबंधित विषयातील तज्ज्ञांकडूप पुढे नेणे गरजेचे ठरते. म्हणून राज्य शासनाने ह्यसेवाग्राम जागतिक वारसास्थळ नामांकन समितीह्ण स्थापन करावी, अशी मागणी नव्याने करण्यात आली आहे. वारसा यादीत नामांकन मिळणे ही प्रत्येक देशासाठी अभिमानाची बाब असते, असे बहारचे प्रा. किशोर वानखेडे यांनी नमूद केले. त्यानिमित्याने स्थळाचे जागतिक महत्त्व अधोरेखित होते. आंतरराष्ट्रीय पर्यटकांना स्थळ खुणावते. म्हणून वर्धेकरांना सेवाग्राम आश्रमाच्या समावेशाची प्रतीक्षा आहे.

याबाबत  सचिव दिलीप विरखेडे म्हणाले, गतवर्षी सप्टेंबर महिन्यात मुख्यमंत्र्यांना  निवेदन पाठविण्यात आले होते. त्यांनतर हे निवेदन पुढील कार्यवाहीसाठी  सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य सचिव यांना पाठविण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयातून बहारला कळविण्यात आली. आता शासनाने ही प्रक्रिया गतिमान करावी, अशी अपेक्षा बहारचे रवींद्र पाटील, राहुल तेलरांधे, डॉ. बाबाजी घेवडे, संजय इंगळे तिगावकर व अन्य पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

आज फेसबुकवर व्याख्यानमाला

उद्या, रविवारी सायंकाळी सात वाजता जागतिक वारसादिनानिमित्त बहार संस्थेने फेसबुक लाईव्ह व्याख्यानमालेचे आयोजन  केले आहे. जागतिक वारसास्थळ या विषयावर निखील जैन व शिवानी शर्मा हे संवाद साधतील. नागरिकांनी यात सहभागी होण्याचे आवाहन बहारने केले आहे.