News Flash

सेवाग्राम आश्रमात काँग्रेसलाच ‘चले जाव’?

राजकीय कार्यक्रमांना मनाई करण्याची परंपरा पाळत असल्याचा पवित्रा

|| प्रशांत देशमुख

राजकीय कार्यक्रमांना मनाई करण्याची परंपरा पाळत असल्याचा पवित्रा

जनमानसाच्या मनात महात्मा गांधी आणि काँग्रेस या दोन गोष्टी एकरूप आहेत. आजची काँग्रेस गांधीविचारांशी किती एकनिष्ठ आहे, हा वादाचा विषय होऊ शकतो. परंतु तरीही काँग्रेस पक्ष वध्र्याच्या सेवाग्राम आश्रमात पाय ठेवायच्या लायकीचाच नाही, अशा पूर्वग्रहातून कुणी काँग्रेसला दुय्यम वागणूक देणे तरी गांधी विचारांशी कुठे अनुरूप आहे? परंतु असाच प्रकार सध्या सेवाग्राम आश्रमात सुरू आहे.

महात्मा गांधींच्या दीडशेव्या जयंतीपर्वाच्या निमित्ताने २ ऑक्टोबरला सेवाग्राम आश्रमात काँग्रेसने राष्ट्रीय कार्यकारिणीची बठक घेण्याचे ठरविले. पक्षाची बडी नेतेमंडळी आश्रम परिसराचा त्यादृष्टीने आढावा घेण्यास आली. पण आश्रम प्रतिष्ठानचा नकारार्थी सूर ऐकून ती परतली. आश्रमात राजकीय कार्यक्रम घेण्यास मनाई असल्याचे आश्रमवासी सांगतात, पण शासकीय कार्यक्रमातील भाजपच्या नेत्यांची उपस्थिती ते कशी खपवून घेतात, हा प्रश्न आहे. ज्यांनी गांधीविचारास हयातभर विरोध केला त्यांच विचारसरणीच्या लोकांचा सहभाग आश्रमातील कार्यक्रमात कसा चालतो, असाही प्रश्न निरूत्तरित राहतो आहे.

‘ही आमची काँग्रेस नव्हे,’ असे मानणारा मोठा वर्ग गांधीवाद्यांमध्ये आहे. विनोबाजी गेले, आणि आमचा काँग्रेसशी संबंध संपला, असाही सूर आहे. इंदिराजींच्या काळात गांधीवाद्यांनी सोसलेले अपमानाचे वळ उरल्यासुरल्यांना काँग्रेसशी फारकत घेण्याचे कारणीभूत ठरल्याचे समजते. अशा तीन टप्प्यांवर काँग्रेसपासून दुरावलेले काही जण ‘सर्वसेवा संघा’च्या माध्यमातून आश्रमाचे संचालन करतात. आणीबाणीच्या काळात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी गांधी विचार परिषद, गांधी पीस फाऊंडेशन आणि अन्य काही संस्थांवर परदेशी देणगी स्वीकारत असल्याचा ठपका ठेवत कारवाई केली होती. चौकशीसाठी त्यावेळी नेमलेल्या कुडाळ कमिशनचे नष्टचर्य आहेच. त्याचे फटके बसलेले काही गांधीवादी हे व्रण आजही उगाळत असतात. सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे विद्यमान अध्यक्ष टी.आर.एन. प्रभू हे ‘मिसा’ अंतर्गत तुरुंगवास भोगलेल्यांपैकीच एक आहेत.

सर्व राजकीय पक्षांना समांतर अंतरावर ठेवणारा आणि मोदीविचार प्रभावी होऊ नये म्हणून विद्यमान काँग्रेसची पाठराखण करणारा, असे दोन तट गांधीवाद्यांमध्ये अलीकडच्या काळात पडले. सर्वाना समान अंतरावर ठेवू म्हणणारे दुसऱ्या गटासाठी खलनायक ठरतात. कारण अशी भूमिका घेत ते भाजपचेच समर्थन करीत असल्याचा दुसऱ्या गटाचा आरोप असतो. मोदीप्रवाह वरचढ होत असताना तो रोखण्याचा विचार करणाऱ्या काँग्रेसला आश्रमाने बळ का देऊ नये, असा सूर काँग्रेसच्या वर्तुळात आहे.

काँग्रेस कार्यकारिणीची बैठक घेण्यास विरोध होत असल्याचा प्रचार झाल्याने आश्रमवासी कात्रीत सापडले आहेत. आश्रम प्रतिष्ठान पदाधिकाऱ्यांची निवड करणाऱ्या ‘सर्वसेवा संघा’ने आश्रमालगतचाच परिसर पर्याय म्हणून काँग्रेसपुढे ठेवला आहे. त्यामुळे बैठक ऐतिहासिक करण्याचा काँग्रेस नेत्यांचा संकल्प पूर्ण होण्याची शक्यता आहे.

याच गांधीवाद्यांचे पूर्वसूरी असलेल्यांनी डॉ. मनमोहन सिंग सरकारने दिलेली पाच कोटी रुपयांची मदत नाकारली होती. सरकारी मदत न घेण्याचा संकल्प असल्याचे त्यावेळी सांगणाऱ्या या गांधीवाद्यांनी राजकीय कार्यक्रमास अस्पृश्य ठरविले होते. आता मात्र त्यांची भूमिका बदललेली दिसत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या भरघोस आर्थिक मदतीने तयार होत असलेल्या सेवाग्राम विकास आराखडय़ासाठी ही मंडळी समरसून सहकार्य करीत असल्याने काँग्रेस समर्थकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.

‘काँग्रेसवर राग नाही’

काँग्रेस बैठकीच्या वादावर बोलताना प्रतिष्ठानचे अध्यक्ष टी.एन.आर. प्रभू म्हणाले, राजकीय कार्यक्रमास मनाई करण्याची परंपराच मी पाळत आहे. याठिकाणी सर्वाचेच स्वागत आहे. आश्रमाच्याच प्रार्थनेत सहभागी व्हावे, हा हट्ट नाही. कुणी केव्हाही या परिसरात प्रार्थना करू शकतो. आश्रमाचा परिसर जुना असल्याने काही झोपडय़ा जीर्णावस्थेत आहे, म्हणून राहुल गांधी आणि त्यांच्या १०० सहकाऱ्यांनाच प्रवेश देण्याचे बंधन मी घातले. आश्रम परिसरालगत असणाऱ्या जागेवर अन्य संस्थेची मालकी असल्याने मी त्याविषयी बोलणार नाही, असे प्रभू यांनी स्पष्ट केले. काँग्रेसवर राग आहे, असे समजण्याचे कारण नाही, असाही खुलासा त्यांनी केला.

विनोबा आश्रमाची टीका

विनोबा भावे यांचे जन्मगाव असलेल्या गागोदे येथील विनोबा आश्रमचे विजय दिवाण यांनी बैठकीस नकार देणाऱ्या आश्रमवासीयांवर थेट टीका केली आहे. ही सवरेदयी मंडळी संघाविषयी सहानुभूती बाळगून असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2018 12:30 am

Web Title: sevagram ashram mahatma gandhi congress party
Next Stories
1 इंडोनेशियात हाहाकार
2 काँग्रेसला फक्त खोटया बातम्या पसरवण्यात रस – नरेंद्र मोदी
3 संयुक्त राष्ट्रातील सुषमा स्वराज यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे
Just Now!
X