लोकसत्ता प्रतिनिधी

वर्धा : सेवाग्राम आश्रमाचा जागतिक प्रेरणा केंद्र म्हणून लौकिक निर्माण करण्यासाठी सर्व ते प्रयत्न केला जाईल अशी हमी देतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध कार्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही अशी ग्वाही दिली. आज महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सेवाग्राम विकास आराखड्याच्या विविध विकास कामांचे लोकार्पण सेवाग्रामच्या कस्तुरबा रूग्णालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात करण्यात आले. मुख्यमंत्री ठाकरे हे मुंबईतून व उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्यातून डिजिटल माध्यमातून सहभागी झाले होते. सभागृहातील कार्यक्रमात पालकमंत्री सुनील केदार, आमदार रणजीत कांबळे, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे टी.एन.आर. प्रभू, जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

या  कार्यक्रमात उपस्थितांना संबोधतांना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की सेवाग्राम आश्रम हे प्रेरणा केंद्र आहे. जगभरातील गांधी अनुयायी आणि पर्यटकांसाठी हे स्थळ आकर्षणाचे ठिकाण व्हावे म्हणून आश्रमाला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळण्याची गरज आहे. आपल्या कामातून काळाला दखल घ्यायला लावणारी व्यक्तिमत्वेच महात्मा होतात. प्रसाराची कसलीच साधने नसतांनाही स्वातंत्र्य संग्रामाला चळवळीचे स्वरूप देण्याचे काम महात्माजींनी केले. गांधीजी येणार असे कळल्यानंतर त्या जागी प्रचंड गर्दी व्हायची, अशी आठवण आपल्या आजोबांनी सांगितल्याचा दाखला मुख्यमंत्र्यांनी दिला. येथील महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांचे शिल्प तयार करणाऱ्या जे.जे. स्कूलच्या विद्यार्थ्यांचा मला एक माजी विद्यार्थी म्हणून अभिमान असल्याचे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सेवाग्राम व पवनार आश्रम तसेच धाम नदीच्या सौंदर्यीकरणाचे काम करताना पावित्र्य जपले जावे, पर्यावरणाचा ऱ्हास होवू नये म्हणून काळजी घ्यावी,परिसरात देशी झाडे लावाली असे आवाहन करतांनाच निधीची कमतरता पडू देणार नसल्याची ग्वाही दिली. पालकमंत्री केदार यांनी येथील कामाबाबत सातत्याने पाठपुरावा केल्याचे अजित पवार यांनी नमूद केले. पालकमंत्री केदार यांनी कारागीर प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव पाठविल्याचे नमूद केले. महात्मा गांधी व विनोबा भावे यांचे शिल्प अद्वितीय ठरेल, असे आहे. औद्योगिक व मोटार वाहनांच्या स्क्रॅप वापर करून तयार झालेले जगातील पहिलेच असे हे शिल्प असल्याचे जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी आभार व्यक्त करतांना स्पष्ट केले.