23 January 2021

News Flash

वैद्यकीय विद्यार्थ्यांत समाजभान निर्माण करणारी ‘सेवांकुर’

विकास भारती संस्थेचे प्रमुख पद्मश्री अलोक भट यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने हे शिबीर पार पडले.

झारखंड येथील बिशनपूर गावात सेवांकुरच्या शिबिरात सहभागी झालेले वैद्यकीय विद्यार्थी.

प्रदीप नणंदकर, लोकसत्ता

लातूर : हल्लीची पिढी दिवसेंदिवस आत्मकेंद्री होऊ लागली आहे. त्यांच्यात समाजभान निर्माण करण्यासाठी ‘सेवांकुर’ ही संस्था धडपडत आहे. गेल्या २३ वर्षांत संस्थेने हजारो विद्यार्थ्यांना दिशा दिली.

औरंगाबाद येथील हेडगेवार रुग्णालयाचे संस्थापक सदस्य डॉ. अश्विनीकुमार तुपकरी यांनी वैद्यकीय विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक दृष्टिकोन निर्माण व्हावा यासाठी व्यक्तिगत पातळीवर १९९६ पासून दर बुधवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतीगृहावर जाऊन विद्यार्थ्यांशी तासभर गप्पा मारण्याचे ठरवले. याचे सातत्य सलग १३ वर्षे राहिले. प्रारंभी विद्यार्थ्यांची ओळख झाली. चहापाणी, गप्पाटप्पा यांतून मत्री वाढत गेली. पुस्तक वाचन सुरू झाले. औरंगाबाद शहरात छोटे, मोठे अनिवासी कार्यक्रम घेतले गेले. विद्यार्थ्यांच्या आग्रहावरून वनवासी भागात जाऊन विद्यार्थ्यांना तेथे लोक नेमके कसे राहतात? डॉक्टर म्हणून आपली भूमिका नेमकी काय असायला हवी? अशा चर्चा होत गेल्या. २०१० मध्ये राज्यातील २५ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना दोन दिवसांच्या निवासी शिबिरासाठी संपर्क करण्यात आला. त्यातून २३ महाविद्यालयांतील ३०० विद्यार्थ्यांचे वाल्मी येथे निवासी शिबीर घेण्यात आले.

२०१५ नंतर देशातील विविध भागांत असे शिबीर घ्यावे, अशी कल्पना पुढे आली. चित्रकुट, कन्याकुमारी, छत्तीसगडमधील जसनपूरनगर व यावर्षी झारखंडमधील बिशनपूर येथे अशी शिबिरे घेण्यात आली.

१ फेबुवारी ते ८ फेब्रुवारीपर्यंत झारखंड येथे झालेल्या शिबिरात लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तृतीय वर्षांत शिकणाऱ्या वैशाली कुंभार व सिद्धी सारडा या दोघी सहभागी झाल्या होत्या. सोळाजणांचा एक गट, त्या गटाचा एक गटप्रमुख डॉक्टर अशी रचना करण्यात आली होती व संपूर्ण शिबिराचे प्रमुख डॉ. प्रसन्न पाटील होते.

विकास भारती संस्थेचे प्रमुख पद्मश्री अलोक भट यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने हे शिबीर पार पडले. मूळचे उत्तर प्रदेशातील अलोक भट हे झारखंड येथील आदिवासी भागात काम करायला आल्यानंतर अंगावरील सूट, बुट समारंभपूर्वक नदीत विसर्जति करून गेल्या २० वर्षांपासून कंबरेला धोतर व अंगावर कांबळ या वेशात राहतात. आदिवासींच्या सुख-दुखात समरस होऊन त्यांचे सुरू असलेले काम पाहून विद्यार्थी भारावून गेले.

विद्यार्थ्यांनी उभारले रुग्णालय

विविध उपक्रमातून आतापर्यंत सुमारे पाच हजार विद्यार्थी ‘सेवांकुर’च्या मांडवालाखालून गेले आहेत. नाशिक येथे सेवांकुरचा अनुभव घेतलेल्या विद्यार्थ्यांनी दहा वर्षांपूर्वी पाच एकरावर ‘श्री गुरुजी रुग्णालय’ हे ६५ खाटांचे रुग्णालय उभारले आहे. गावोगावी आपापल्या स्तरावर वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर समाजभान ठेवून हे विद्यार्थी काम करतात. यावर्षी आत्मभानाकडून समाजभानाकडे असे सूत्र शिबिराचे ठरले होते. वैद्यकीय शिक्षण घेत असताना केवळ पुस्तकी शिक्षण मिळते. हे शिक्षण का घ्यायचे? याचा हेतू काय व समाजात लोक किती वेगवेगळय़ा प्रकारे सामाजिक भान ठेवून काम करतात याचे दर्शन अशा शिबिरातून घडते व भविष्यात विद्यार्थ्यांना वेगळी दिशा ठरवण्यासाठी मदत होते. डॉ. अश्विनीकुमार तुपकरी यांनी दिलेल्या ‘सेवांकुर’ या नावाचे सार्थक विद्यार्थी करत आहेत. आता विविध शिबिरात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांकडूनच हा प्रकल्प योग्य पद्धतीने चालावा यासाठी सहकार्य व सहभाग मिळतो आहे. वसतीगृहावर विद्यार्थ्यांना भेटायला जाण्याचा उपक्रमाचा एवढा मोठा विस्तार वाढेल हे स्वप्नातही वाटले नव्हते असे त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2020 2:18 am

Web Title: sevankur organization that creates social awareness among medical students zws 70
Next Stories
1 रायगडमधील सहकारी बँकांना घोटाळ्यांचे ग्रहण!
2 ‘बविआ’च्या जव्हार तालुकाध्यक्षाला अटक
3 पालघरमधील शीतगृह निरुपयोगी
Just Now!
X