महाबळेश्वर येथील पालिकेच्या कचराडेपो जवळील जंगलामध्ये सात जनावरांचा विषबाधेने मृत्यू झाल्याची घटना सकाळी निदर्शनास आली. या कचरा डेपोच्या बाजूलाच विस्तीर्ण जंगल असल्याने मृत जनावरांचा हा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

महाबळेश्वर शहरापासून अंदाजे पाच किमी अंतरावर तापोळा रस्त्यावर कारवी आळी हा भाग असून त्याच्याबाजूलाच महाबळेश्वर पालिकेचा कचरा डेपो आहे. या कचरा डेपो परिसरात मोठ्याप्रमाणावर जनावरं व कुत्र्यांचा वावर असतो. जंगल परिसरातूनही अनेक जनावरं येथे चरण्यासाठी येतात. याबाबत येथील गावकऱ्यांनी कचरा प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर जनावरांचा उपद्रव होत असून कचरा, प्लास्टिक व तत्सम पदार्थांमुळे जनावराच्या आरोग्यास धोका निर्माण होत असल्याबाबत पालिका प्रशासनास कळवले देखील होते.

स्थानिकांच्या पाळीव जनावरांसह भटकी जनावर या ठिकाणी खाद्य मिळेल या आशेने येतात असतात. दरम्यान आज कचरा डेपो परिसरातील जंगलामध्ये तीन व जंगल परिसरात चार अशी एकूण सात जनावरं मृत अवस्थेत दिसून आली. गावकाऱ्यांनी याबाबतची माहिती पदाधिकाऱ्यांना दिल्यानंतर या ठिकाणी भेट देऊन पाहणी करण्यात आली. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.जयसिंग सिसोदिया, डॉ.संदीप आरडे यांनी जनावरांची पाहणी करून केल्यांतर त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. ही जनावरं विषबाधा करून मारण्यात आली की, विषबाधा झाल्याने त्यांचा मृत्यू झाला? याची चौकशी होण्याची आवश्यकता असल्याचे दिसत आहे.

प्राथमिक माहिती नुसार विषबाधा झाल्यामुळे जनावरांचा मृत्यू झाला असलयची शक्यता आहे. हा विषाचा कोणता प्रकार आहे हे समजण्यासाठी नमुने प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आले असल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. जयसिंग सिसोदिया यांनी सांगितलं आहे.