येथील पालकमंत्री संजय देवतळे यांना रविवारी जनक्षोभाला सामोरे जावे लागले. शहरातील पूरग्रस्तांच्या भेटीला आलेले देवतळे जिल्हाधिकारी दीपक म्हैसेकर व इतर अधिकाऱ्यांच्या साथीने येथील सिस्टर कॉलनीत आले असता त्यांना संतप्त नागरिकांनी फैलावर घेतले. वाद वाढत जाऊन अखेरीस संतप्त नागरिकांनी देवतळे यांच्या गाडीवर दगडफेक केली.
दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी सात जणांना अटक केली असून ६० जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सिस्टर कॉलनीतील ध्वनी इमारतीसमोर जमलेल्या नागरिकांनी पालकमंत्र्यांविरोधात रोष प्रकट केला. देवतळे नागरिकांची समजूत काढत असतानाच भाजप व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधात घोषणा दिल्या. पालकमंत्री परत जाण्यास निघाले असता त्यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी संतप्त जमावाला नियंत्रित करण्यासाठी लाठीमार केला. त्यात १२ जण जखमी झाले.
अफवेमुळेच..
पूरग्रस्त भागाची पाहणी करून पूरग्रस्तांना शासनाने जाहीर केलेली आर्थिक मदत पालकमंत्री वाटप करणार असल्याची खोटी माहिती भाजपचे नगरसेवक राहुल पावडे, काँग्रेसचे अशोक नागापुरे, संजय महाडोळे, अन्सारी व या भागातील काही नेत्यांनी परिसरातील लोकांना भ्रमणध्वनीवरून दिली. त्यामुळेच सिस्टर कॉलनीत पालकमंत्री दाखल होताच नागरिकांचा मोठा जमाव त्यांच्यासमोर आला. आर्थिक मदत न देताच पालकमंत्री जात असल्याचे बघून संतप्त जमावाने आरडाओरड सुरू केली. त्यातूनच ही दगडफेक झाल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.