जिल्ह्यात उन्हाळ्याच्या पार्श्र्वभूमीवर पिण्याच्या पाण्याची मागणी वाढण्याची शक्यता गृहीत धरून संभाव्य टंचाई निवारणासाठी सुमारे पावणेसात कोटीचा टंचाई कृती आराखडा तयार करून सर्व यंत्रणांनी आराखडय़ानुसार कार्यवाही करण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी सोमवारी दिली.
जिल्ह्यात सद्या केवळ ३ टॅंकर सुरू असून संभाव्य काळात निर्माण होणारी टंचाई परिस्थिती विचारात घेऊन टंचाई निवारणाच्या उपाययोजनांना प्रशासनाने गती दिल्याचे स्पष्ट करून जिल्हाधिकारी शेखर गायकवाड म्हणाले की, हा टंचाई कृती आराखडा एप्रिल ते ऑगस्ट २०१५ या पाच महिन्यांसाठी १०२ उपाययोजनांचा तयार करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने लोकांना पिण्याचे पाणी, पाणी योजनांचे स्रोत बळकटीकरण आणि त्यांच्या दुरुस्तीच्या कामासही प्राधान्य दिले आहे. टंचाई निवारणाच्या उपाययोजनांना आतापासूनच सुरुवात केली आहे.
 याबरोबरच जिल्ह्यात ४७ लाख २३ हजार ३ मजूर क्षमतेची ८ हजार ८७ कामे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मंजूर करून ठेवली आहेत. सध्या जिल्ह्यात ३३८ कामे सुरू असून या कामांवर ५ हजार १२४ मजूर काम करीत आहेत.  जिल्ह्यात टंचाई निवारणाच्या प्रमुख कामाबरोबरच जलयुक्त शिवार अभियानास सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.
संभाव्य टंचाई कृती आराखडय़ानुसार विहीर तसेच बोअर अधिग्रहणाच्या २५ लाख खर्चाच्या ५७ उपाययोजना करण्यात आल्या असून लोकांना टँकरने पाणी पुरवठा करण्याच्या सुमारे दीड कोटी खर्चाच्या ४२ उपाययोजनांचाही समावेश आहे. याबरोबरच जिल्ह्याच्या दुष्काळी जनतेला वरदान ठरणाऱ्या ताकारी, म्हैशाळ, आरफळ तसेच टेंभू उपसासिंचन योजनांच्या कामांना शासनाने प्राधान्य दिले असून या उपसा सिंचन योजनेची वीज देयके देण्यासाठीच्या ३ उपाययोजनांसाठी ५ कोटींची तरतूद या आराखडय़ात करण्यात आली आहे. जिल्ह्यातील टंचाईची तीव्रता जाणवणाऱ्या गावांची माहिती घेऊन ह्या आराखडय़ात आवश्यकतेनुसार सुधारणा करण्याची सूचना जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी संबंधितांना केली आहे.
याबरोबरच राज्य शासनाचा प्राधान्य क्रमाचा कार्यक्रम म्हणून जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मार्च २०१६ पर्यंत जिल्ह्यातील १४१ गावे टंचाईमुक्त करण्यासाठी प्रशासनाने आता कंबर कसली आहे. जलयुक्त शिवार योजनेच्या गावांमध्ये जिल्हा नियोजन समितीअंतर्गत २३ कोटी ५० लाखांच्या निधीतून कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यातील गाळ काढण्यासाठी २४ लाख, स्थानिक स्तर कडील १४ कोटी १० लाखांच्या सीएनबी कामांना मंजुरी, छोटे पाटबंधारे विभागाकडील ९ कोटी १६ लाखांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. तसेच मनरेगातून पूर्ण केलेल्या विहिरी व शेततळयासांठी २३ पंपसेट दिले असून जिल्ह्यातील १७९३ चालू विहिरींपकी ४७३ विहिरी पूर्ण केल्या आहेत. जलयुक्त शिवार अभियानाच्या प्रभावी जनजागृतीसाठी मोबाईल व्हॅनद्वारे प्रबोधन केले जात आहे.
जिल्ह्यातील संभाव्य टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासन सजग असून सध्या जिल्ह्यातील मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पामध्ये ३१ टक्के पाणीसाठा आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात जत येथे उमराणी व खानापूर येथे हिवरे या २ गावांना ३ शासकीय टँकरद्वारे १० वाडय़ांतील १० हजार ७९६ लोकसंख्येला टँकरच्या ११ खेपांद्वारे पिण्याचा पाणी पुरवठा केला जात आहे. तर खासगी ४ विहिरी व बोअर अधिग्रहण केले आहे. संभाव्य काळात टंचाईग्रस्त जनतेला पिण्याचे पाणी आणि हाताला काम देण्याबरोबरच जलयुक्त शिवार अभियानातून गावागावांत पाणीसाठा निर्माण करून टंचाईमुक्तीच्या कामाला गती दिली असल्याचेही जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी सांगितले.