लोकसत्ता  वार्ताहर

वाडा : करोनाच्या पार्श्वभूमीवर  देशभरात टाळेबंदी लागू झाल्याने हातावर पोट असणाऱ्या गरीब कुटुंबीयांची उपासमार होत आहे. काहींकडे शिधापत्रिका नसल्याने  जीवनावश्यक वस्तू मिळेनाशा झाल्या आहेत. अशा कुटुंबांना शिधापत्रिका तात्काळ देण्याकरिता वाडा तहसीलदारांनी मोहीम आखली होती. केवळ तीन दिवसांत सुमारे ७०० हून अधिक शिधापत्रिका लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळाला आहे.

श्रमजीवीचे संस्थापक विवेक पंडित यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून या राज्यात १८ हजारपेक्षा जास्त वंचित घटक, दुर्बल आदिवासी अजूनही शिधापत्रिकापासून वंचित असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते.  यावर शासनाने शिधापत्रिका असो वा नसो सर्वाना देण्याचे मान्य केले. अंत्योदय व प्राधान्यक्रमाच्या  शिधापत्रिका देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येईल,  असे हमीपत्रात नमूद केले आहे. मात्र प्रत्यक्षात कार्यवाही सुरू केली नाही.  त्याच्या निषेधार्थ श्रमजीवी संघटनेने गेले चार दिवस हक्काग्रह आंदोलन सुरू केले होते. आंदोलनाच्या चार दिवसांत  महसूल अधिकारी, पोलीस अधिकाऱ्यांचे कटू अनुभव  कार्यकर्त्यांना अनुभवायला मिळाले.  मात्र  तहसीलदार उद्धव कदम यांनी नियोजन करून  रात्री उशिरापर्यंत येथील कर्मचाऱ्यांकडून गेल्या तीन दिवसांत सातशेहून अधिक शिधापत्रिका लाभार्थ्यांना वाटप केले.