News Flash

महाबळेश्वरमध्ये स्ट्रॉबेरी सातशे रुपये किलो!

करोना, हवामानातील बदलांमुळे उत्पादनात घट

महाबळेश्वरमध्ये अपवादानेच दिसणारे स्ट्रॉबेरी विक्रीचे स्टॉल.

विश्वास पवार

महाबळेश्वरमध्ये पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेली स्ट्रॉबेरी यंदा चढय़ा भावाने खरेदी करावी लागणार आहे. करोनामुळे कमी झालेली लागवड, त्यातच अतिवृष्टीसह हवामानातील बदल याचा परिणाम यंदाच्या स्ट्रॉबेरी उत्पादनावर झाला आहे. यामुळे यंदा सुरुवातीच्या काळात आलेल्या या फळाला सातशे रुपये किलोचा भाव मिळाला आहे.

महाबळेश्वरला वैशिष्टय़पूर्ण वातावरणामुळे या फळाची येथे मोठय़ा प्रमाणात लागवड केली जाते. मात्र यंदाच्या वर्षी सुरुवातीलाच आलेल्या करोना टाळेबंदीमुळे उत्पादनाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. यामुळे पुढील हंगामातही या उत्पादनाला बाजारपेठ मिळू शकेल का? तसेच  महाबळेश्वरमधील पर्यटन व्यवसाय थंडावल्यामुळे स्थानिक पातळीवर फळांची विक्री होईल का? याबाबत शेतकऱ्यांना साशंकता असल्याने यंदा स्ट्रॉबेरीच्या लागवडीत मोठय़ा प्रमाणावर घट झाली आहे. स्ट्रॉबेरीच्या लागवडीसाठी मोठय़ा प्रमाणात भांडवल गुंतवावे लागते. बाजारपेठेत अनिश्चितता असल्यामुळे अनेक उत्पादकांनी यंदा त्याच्या लागवड केलेली नाही.

तसेच ज्या शेतक ऱ्यांनी धाडस करत स्ट्रॉबेरीची लागवड केली त्यांच्या उत्पादनावरही यंदाच्या अतिवृष्टी, अवकाळी, ढगाळ हवामानाचा परिणाम झाला आहे. यामुळे साधारण दिवाळीनंतर स्ट्रॉबेरीचा हंगाम सुरू होऊन सर्वत्र दिसणारे हे फळ यंदा मात्र अपवादानेच दिसत आहे. या काळात रोज साधारण दीड ते दोन टन फळे बाजारात येत असतात. मात्र तीच आवक सध्या अवघी शंभर ते दीडशे किलोवर आली आहे. यामुळे शनिवारी पाचगणी, महाबळेश्वरमध्ये या स्ट्रॉबेरीला प्रति किलोला  सातशे रुपयांचा दर मिळाला. महाबळेश्वर तालुक्यातील अनिल दिनकर पांगारे (रा. पांगारी), प्रदीप सूर्यकांत दानवले (रा. दानवली), राजाराम किसन भिलारे (रा. भिलार) या शेतकऱ्यांना हा दर मिळाला आहे.

टाळेबंदीमुळे यंदा अनिश्चितता होती. यामुळे स्ट्रॉबेरीची लागवड कमी झाली आहे. वातावरणातील बदलाने या फळाला तडाखा दिला आहे. आता पर्यटन सुरू झाले आहे, परंतु  स्ट्रॉबेरी बाजारात नाही. यामुळे यंदा सुरुवातीला तरी भाव मिळताना दिसत आहे.

– किसनशेठ भिलारे, अध्यक्ष, महाबळेश्वर सहकारी फळे फुले व भाजीपाला खरेदी-विRी संस्था

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2020 12:14 am

Web Title: seven hundred rupees per kg of strawberries in mahabaleshwar abn 97
Next Stories
1 ठाकरे-नाईक परिवारातील आर्थिक व्यवहार लपवताहेत
2 किल्ले रायगडसाठी प्राधिकरणाच्या माध्यमातून नवा रोप वे उभारणार – खा. संभाजीराजे
3 “महापूजेला विरोध दर्शवणारे वारकरी नसून संघाचे चमचे”
Just Now!
X