जिल्ह्यातील करोना बाधितांच्या संख्येत शनिवारी सातची भर पडल्याने रूग्णांची एकूण संख्या २४४ पर्यंत पोहचली आहे. शनिवारी दुपारपर्यंत प्राप्त झालेल्या ९८ तपासणी अहवालांपैकी ९१ जणांचे अहवाल नकारात्मक आले. तर सात अहवाल सकारात्मक आले.

अहवाल सकारात्मक आलेल्या रूग्णांमध्ये जळगाव शहरातील तिघांचा समावेश आहे. हे रूग्ण पिंप्राळा, सम्राट कॉलनी, सिंधी कॉलनी या भागातील आहेत. याव्यतिरिक्त भुसावळ येथील दोन, भडगाव आणि खामगाव (जि. बुलढाणा) येथील एका रूग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यातील रूग्णांची संख्या आता २४४ पर्यंत गेली असून त्यापैकी ४५ रूग्ण करोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. ३० रूग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. दरम्यान, शनिवारी प्राप्त झालेल्या नकारात्मक अहवालांमध्ये भुसावळ येथील ६५ पेक्षा अधिक संशयितांचा समावेश आहे.

दरम्यान, जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा अहवाल सकारात्मक आल्याने १२ विभागप्रमुखांचीही नमुना चाचणी घेण्यात आली होती. या सर्वाचा अहवाल नकारात्मक आला आहे. या सर्वाना घरीच विलगीकरणात राहण्यास सांगण्यात आले आहे.