अकोल्याजवळील नवसाळ फाटय़ाजवळ सोमवारी पहाटे ४.३० वाजता ट्रक व ओम्नी मारुती कारची एकमेकांना जबर धडक झाल्याने कारमधील सात जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात पाच प्रवासी जखमी झाले असून, ट्रकचालकाला पोलिसांनी अटक केली आहे.
अकोला येथील बैदपुऱ्यातील एक कुटुंब सोमवारी पहाटे तीन वाजता कारने नागपूर येथील बाबा ताजुद्दीन यांच्या दर्शनासाठी निघाले होते. पहाटे ४.३० वाजता त्यांची कार नवसाळ फाटय़ाजवळ आली असता अमरावतीवरून भरधाव येणाऱ्या एका ट्रकने या कारला जोरदार धडक दिली. कारमधील तीन बालके, तीन महिलांसह सात जण जागीच ठार झाले. आसीफ नूर, इर्षांद, इस्माईल, नजमा तरन्नूम, मुतल्लीक आसीफ, मुकसीद इस्माईल व मरियम फातिमा ही मृतांची नावे आहेत. मूर्तिजापूर येथील शासकीय रुग्णालयात मृतांना शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले. अपघातातील पाच जखमींना अमरावती येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात कारचा अक्षरश: चेंदामेंदा झाला होता. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांचा ताफा तात्काळ घटनास्थळी पोहोचला. त्यांनी कारमधील जखमींना आणि मृतदेहांना बाहरे काढले. गेल्या आठवडय़ात २६ नोव्हेंबरला याच परिसरातील मधापुरी फाटय़ाजवळ झालेल्या अपघातात बुलढाणा जिल्ह्यातील तांदुळवाडी येथील आठ जणांचा मृत्यू झाला होता.
द्रुतगती मार्गावर अपघातात तीन तरुणी ठार; तीन जखमी
उरण : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर उर्से टोलनाक्याजवळ सोमवारी दुपारी महिंद्रा जीप दुभाजकाला धडकल्याने झालेल्या अपघातात तीन तरुणींचा मृत्यू झाला. या अपघातात अन्य दोन तरुणींसह जीपचालक जखमी झाले. उरण तालुक्यात राहणाऱ्या दीक्षा माने, प्रीती शर्मा, रंजना कडू, धनश्री आणि सोनाली कमाठे या पाच मैत्रिणी दोन दिवसांची सुट्टी असल्याने पुणे येथील शिरगावच्या प्रतिशिर्डी येथे सोमवारी सकाळी दर्शनासाठी गेल्या होत्या. तेथून लोणावळा येथील काल्र्याच्या एकवीरा देवीच्या दर्शनासाठी येत असताना त्यांची जीप दुभाजकाला  धडकल्याने त्यात दीक्षा, प्रीती, रंजना यांचा मृत्यू झाला, तर धनश्री, सोनाली व जीपचालक योगेश भोसले जखमी झाले.