महापालिका आयुक्त गोरे यांची माहिती

नगर : शहरातील स्टेशन रस्त्यावरील खासगी कोविड रुग्णालयात झालेल्या सात जणांच्या मृत्यूचे वैद्यकीय पथकामार्फत परीक्षण (डेथ ऑडिट) केले जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी दिली. दरम्यान या रुग्णालयाच्या डॉक्टरांनी प्राणवायूअभावी सात रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या इन्कार केला.

शहरातील स्टेशन रस्त्यावरील खासगी रुग्णालयातील ७ रुग्णांचा प्राणवायूअभावी मृत्यू झाल्याची माहिती आज, बुधवारी सकाळी समाजमाध्यमावर प्रसिद्ध केली जात होती. यासंदर्भात महापालिका आयुक्त गोरे, मनपाचे उपायुक्त यशवंत डांगे, आरोग्याधिकारी डॉ. अनिल बोरगे व शहराचे पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे यांच्या पथकाने रुग्णालयास भेट देऊन पाहणी केली तसेच डॉक्टरांकडून माहिती घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना गोरे यांनी ही माहिती दिली.

या रुग्णालयातील ७ जणांचा प्राणवायूअभावी मृत्यू झाल्याच्या माहितीचा आयुक्त गोरे यांनी इन्कार केला. या रुग्णालयाकडे प्राणवायूचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या संदर्भात बोलताना रुग्णालयाचे डॉ. सतीश फाटके यांनी स्पष्ट केले की, आपण गेल्या २० वर्षांपासून शहरात वैद्यकीय व्यवसाय करीत आहोत, सात जणांचे जे मृत्यू झाले आहेत ते एकाच वेळी झालेले नाहीत. काल, मंगळवारी सायंकाळी चार ते बुधवारी पहाटे सहा या वेळेत झालेले आहेत. त्यातील पाच जणांना पूर्वीचे विविध प्रकारचे आजार होते. हे सर्व जण करोना रुग्ण होते. त्यातील तीन महिला आहेत. परंतु प्राणवायूचा पुरवठा न झाल्याने मृत्यू झाला असे घडलेले नाही.

पोलीस उपअधीक्षक ढुमे यांनीही या संदर्भात पोलिसांकडे कोणाचीही तक्रार प्राप्त झालेली नसल्याची माहिती दिली.

अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

या संदर्भात बोलताना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन नागरिकांना केले. त्यांनी सांगितले की, करोनाच्या परिस्थितीमुळे प्राणवायूच्या मागणीमध्ये वाढ झालेली आहे. जिल्ह्याची ६० केएल मागणी आहे. ५० केएल पुरवठा मंजूर करण्यात आला आहे. काल, मंगळवारी ४९.५ द्रवरूप प्राणवायू उपलब्ध झाला. आजही ५० टन प्राणवायू उपलब्ध होणे अपेक्षित आहे.

प्राणवायू पुरवठय़ासाठी ‘टास्क फोर्स’

समाजमाध्यमात होत असलेली चर्चा तसेच प्राणवायूचा पुरवठा या संदर्भात डॉक्टरांच्या ‘ईमा’ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज, बुधवारी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांची भेट घेतली. या चर्चेतील निर्णयानुसार ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासन व डॉक्टरांचे प्रतिनिधी यांचा ‘टास्क फोर्स’ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामध्ये संघटनेचे प्रतिनिधी म्हणून डॉ. प्रशांत पठारे, डॉ. अमित बडवे, डॉ. अमित करडे यांचा तर रेमडेसिविर पुरवठाबाबत समितीमध्ये डॉ. सतीश सोनवणे, डॉ. गणेश बडे, डॉ. सचिन पांडुळे यांचा समावेश करण्यात आला आहे. रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईक रुग्णालयात गोंधळ घालण्याचे प्रकार वाढू लागल्याने रुग्णालयांना पोलीस संरक्षण मिळावे, अशी संघटनेने मागणी केली.