* दोन बहिणींची आत्महत्या; बाप-लेक बुडाले * आंध्रातील अपघातात मुखेडचे दोन ठार; १८ जखमी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नांदेड : नांदेड जिल्ह्य़ात श्रावणातला शेवटचा गुरुवार अपघातवारच ठरला. चार वेगवेगळ्या घटनांमध्ये गुरुवारी सातजण ठार झाले. लोहा तालुक्यातील तलावात दग्र्याच्या दर्शनासाठी आलेल्या नवरदेवाचा वडिलांसह तलावात बुडाल्याने मृ्त्यू झाला. शहराजवळील गोदावरी नदीत उडी घेऊन दोन सख्खा बहिणींनी आत्महत्या केली. तर मुखेड तालुक्यातून तिरुपतीला नवस फेडण्यासाठी निघालेल्या भाविकांच्या जीपला आंध्र प्रदेशमध्ये अपघात घडला असून त्यात दोन ठार, तर १८ जण जखमी झाले. मुखेड तालुक्यातच एका शेतकऱ्याचा मळणी यंत्रात अडकून मृत्यू झाला.

शहरातील पावडेवाडी नाका परिसरातील राजनगर येथील गुणवंत भगत यांच्या दोन मुली सुप्रिया भगत (वय १७) व रुपाली भगत (वय १९) यांनी गोदावरीत उडी घेऊन आत्महत्या केली. दोघीही हस्सापूर परिसरात असलेल्या पश्चिम वळण रस्त्यावरील विष्णुपुरी भागाला जोडणाऱ्या गोदावरी नदीच्या पुलावर गेल्या होत्या. परिसरात असलेल्या शेतातील आखाडय़ावरील काही नागरिकांनी ही घटना पाहिली व लगेच त्यांनी गोदावरी पात्राकडे धाव घेऊन मुलींना वाचवण्याचा प्रयत्न केला. काही तरुणांनी एकीचा मृतदेह बाहेर काढला; परंतु दुसरीचा मृतदेह बराच काळ शोधाशोध केल्यानंतर सापडला. मृतदेह शोधण्यासाठी गोदावरी जीवरक्षक दलाच्या जवानांनी परिश्रम घेतले. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चिखलीकर, उपनिरीक्षक एस. ए. कदम, जमादार प्रवीण केंद्रे यांनी पंचनामा केला.

लोहा तालुक्यातील किरोडा गावी दग्र्याच्या दर्शनासाठी आलेले शेख सतार अली गफार (वय ६०), मुलगा शेख गफार अ. सतार (वय २३) यांचा स्थानिक तलावात बुडून मृत्यू झाला. निजामाबाद तेलंगणा गफार यांचे कुटुंबीय नवदाम्पत्यासह दर्शनासाठी आले होते.

तलावात आंघोळ करण्यासाठी उतरलेला मुलगा बुडत असल्याचे लक्षात येताच वडीलही पाण्यात उतरले होते. मुलाचे चार दिवसांपूर्वीच लग्न झाले होते. मृतदेह शोधण्यासाठी नांदेड मनपाचे जीवरक्षक दलाने शोधमोहीम सुरूच ठेवली होती. सहायक पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे, मंडळ अधिकारी केशव भोसीकर, आर. जी. जहागीरदार, अभियंता शेख आक्रम, नगरसेवक शरफोदीन शेख आदींनी प्रयत्न केले.

मुखेड तालुक्यातील बेळी (बु.) येथील तरुण शेतकरी मनोज हनमंतराव जुन्ने (वय २२) यांचा मळणी यंत्रात अडकून मृत्यू झाला. त्यांच्या शेतात उडदाची रास चालू होती. यासाठी त्यांनी भाडय़ाने मळणी यंत्र आणले होते. मळणी यंत्र अचानक बंद पडल्याने मनोज ते पाहात असताना यंत्र अचानक चालू झाले. यामध्ये प्रथम हात अडकला व नंतर संपूर्ण शरीर यंत्रात जाऊन चेंदामेंदा झाले.

तिरुपतीला जाताना अपघात; दोन ठार

आंध्र प्रदेश मधील कर्नूल ते कडप्पा या मार्गावर गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास झालेल्या अपघातात मुखेड तालुक्यातील वसूर तांडा येथील दोन भाविक ठार, तर १८ जण जखमी झाले. हे भाविक तिरुपती येथे नवस फेडण्यासाठी जीपने जात असताना दुभाजकाला धडकून पुलाखाली धडकले. सर्व जखमींवर कडप्पा येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे. या अपघातात लक्ष्मण गणपती चव्हाण (६०, रा. वसूर तांडा), गणेश उत्तम चव्हाण (१८) यांचा जागीच मृत्यू झाला, तर तेजराव रामा राठोड, श्रीपती राठोड, संध्या राठोड (१४), स्वप्नील राठोड, रेखा राठोड, जिजाबाई लक्ष्मण चव्हाण, मनील चव्हाण, गंगाराम राठोड, अर्चना राठोड, रणजीत गंगाराम राठोड, सीमा राठोड, राजू राठोड, शीतल राठोड यांच्यासह इतर चार ते पाच जण गंभीर जखमी झाले. मार्च महिन्यात लक्ष्मण गणपती चव्हाण यांच्या मुलीला मुखेड जवळ अपघात झाला होता. त्यात शीतल राठोड गंभीर जखमी झाल्या होत्या. त्या लवकर ठणठणीत व्हाव्यात, यासाठी लक्ष्मण चव्हाण यांनी नवस बोलला होता. लक्ष्मण चव्हाण हे बहीण व मुलीच्या कुटुंबासह ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी मुखेडहून रवाना झाले होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Seven people died in different accident in nanded
First published on: 07-09-2018 at 02:16 IST