News Flash

पावसाचे संकेत देणाऱ्या किटकांच्या राज्यात सात नव्या प्रजाती

जैवविविधता आणि पर्यावरणाचे सुचक असलेल्या आणि पावसाचे संकेत देणाऱ्या किटकांच्या ( ओडोनाटा किंवा ड्रॅगनफ्लाय) विभिन्न प्रजातीची संख्या गेल्या ५० वर्षांत वेगाने कमी

| June 5, 2014 02:59 am

जैवविविधता आणि पर्यावरणाचे सुचक असलेल्या आणि पावसाचे संकेत देणाऱ्या किटकांच्या ( ओडोनाटा किंवा ड्रॅगनफ्लाय) विभिन्न प्रजातीची संख्या गेल्या ५० वर्षांत वेगाने कमी होत असल्यामुळे या प्रजातीचे संवर्धन करण्याची गरज संशोधक व्यक्त करत आहेत. अलीकडेच आययुसीएन (इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर) आणि स्पेसीस सर्वायव्हल कमिशन साऊथ एशियन इन्वर्टेबट्र्स स्पेश्ॉलिस्ट ग्रुपचे सदस्य डॉ. आशिष टिपले, तसेच कोवरकर या दोन संशोधकांनी २००६ ते २०१३ या वर्षांत देशात ओडोनाटाच्या ८२ प्रजातींची नोंद केली. त्यापैकी १३ प्रजाती विदर्भासाठी, तर सात प्रजाती महाराष्ट्रासाठी नवीन असल्याचे आढळले. पारदर्शक लांब पंखांच्या या कीटकाला महाराष्ट्रातील बोलीभाषेत भिंगोटी किंवा ढोरगांजा, तर इंग्रजीत याला ड्रॅगनफ्लाय म्हणतात. पावसाच्या आगमनाचे संकेत देणारे हे कीटक आकाशात मोठय़ा संख्येने फिरतात. आकाशात उंचावर फिरताना ते हेलिकॉप्टरसारखे दिसत असल्यामुळे लहान मुले या कीटकांना हेलिकॉप्टर, असेच म्हणतात. त्यामुळे जैवविविधता आणि पर्यावरणासाठी हा सकारात्मक संकेत मानला जात आहे.

ओडोनाटाच्या जगभरात सुमारे पाच हजार विविध प्रजाती आढळून आल्या आहेत. यातील सुमारे ४६५ प्रकारच्या ओडोनाटाच्या जाती व उपजाती भारतात आहेत. त्यापैकी सुमारे २०१ जाती या देशाच्या पूर्व, पश्चिम आणि दक्षिण घाटात (पेनीन्सुलर इंडिया) आढळतात. भारतीय ओडोनाटा केवळ २६५ इतक्या संख्येने असून त्यापैकी केवळ १५-२० ओडोनाटाच्या जीवनचक्राची संपूर्ण माहिती उपलब्ध आहे. भारतात ओडोनाटाचा बराच अभ्यास झाला असला तरीही त्याच्या जीवनचक्राबद्दल अतिशय कमी माहिती उपलब्ध आहे. १९३० मध्ये भारतीय ओडोनाटावर ‘फ्रेझर्स फौना बुक’ प्रसिद्ध झाले. त्यानंतर ओडोनाटावर फारसे काम झाले नाही. पाण्याच्या ज्या साठय़ांजवळ ओडोनाटाची संख्या अधिक असेल, ते पाणी प्रदूषणविरहीत असल्याचे मानले जाते. मात्र, पाण्याचे कालवे, वाळू उत्खनन, प्रदूषण, शहरीकरण यामुळे ओडोनाटावर गंडांतर आले आहे.
गेल्या २००४ मध्ये आययुसीएनने प्रसिद्ध केलेल्या रेड डाटा बुकमध्ये बर्मागोम्फस सिवालिकेन्सिस, सेफालॅस्क्ना अ‍ॅक्युटीफ्रॉन्स आणि इपिओफ्लेबिया या तीन ओडोनाटा प्रजाती वायव्य भारतात धोक्यात असल्याची नोंद करण्यात आली होती. इक्टिनोगोम्फस डिस्टीन्क्टस ही ओडोनाटाची प्रजाती संशोधक राम यांनी १९८५ मध्ये पश्चिम बंगालमध्ये हावडा येथे शोधली. त्यानंतर २००९ मध्ये नागपुरात फुटाळा तलावाजवळ ही प्रजाती त्यांना आढळून आली. कॅकोनेऊरा रामब्युरी ही पश्चिम घाटातील इन्टेमिक प्रजाती आता विदर्भातही आढळून आली आहे. अ‍ॅनेक्स पाथ्रेनोप ही ओडोनाटा प्रजाती उत्तर भारत आणि वेस्टर्न घाटामध्ये सातत्त्याने आढळून येत होती. एथ्रीमंन्टा ब्रेव्हीपेनीस ही ओडोनाटा प्रजाती बिहार, पश्चिम बंगाल आणि पश्चिम घाटात आढळून येत होती. या दोन्ही प्रजाती आता आययुसीएनच्या मार्गदर्शक तत्वानुसार डाटा डिफिशियन्ट म्हणून आढळतात. पुण्यातील झुऑलॉजिकल सव्‍‌र्हे ऑफ इंडियाचे डॉ. कुळकर्णी व कोवरकर यांनी २०१२ मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात १०१ ओडोनाटा प्रजाती असल्याची नोंद केली होती. ओडोनाटाच्या अनेक प्रजाती स्थलांतरित, तर काही नाहीशा झाल्या आहेत. त्यामुळे त्याच्या संवर्धनाची हाक त्यावर काम करणाऱ्या संशोधकांनी दिली आहे. डॉ. टिपले व कोवरकर यांचा ओडोनाटावरील शोधनिबंध ओडोनेटालॉजिया (नेदरलँड) या जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 5, 2014 2:59 am

Web Title: seven races of insect in maharashtra predicts rain
टॅग : Maharashtra Rain
Next Stories
1 वादळी पावसाने महावितरणचे कोटय़वधींचे नुकसान
2 भारतातही जगण्यासाठी विकत घ्यावा लागेल प्राणवायू
3 कृषक व कामगार संघटनेला चालना
Just Now!
X