पालघर जिल्ह्यत सात हजार उपचाराधीन रुग्ण; अतिदक्षता, कृत्रिम श्वसनयंत्रणेच्या खाटांचा अभाव

पालघर : मुंबई, ठाणे जिल्ह्यंतील करोनाचा प्रसार काहीसा कमी झाला असला तरी, पालघर जिल्ह्यातील करोनाचे संकट अजूनही कायम आहे. जिल्ह्यात दररोज केल्या जाणाऱ्या चाचण्यांमध्ये करोनाबाधित आढळण्याचे प्रमाण २५ टक्क्यांच्या आसपास आहे. त्यातच जिल्ह्यात आरोग्यव्यवस्था मर्यादित असून सद्य:स्थितीत शासकीय रुग्णालयांत प्राणवायू, अतिदक्षता तसेच कृत्रिम श्वसनयंत्रणेची एकही खाट उपलब्ध नाही. गंभीर होणाऱ्या रुग्णांना लगतच्या वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात किंवा जिल्ह्य़ाबाहेर उपचारांसाठी शोध घेणे भाग पडत आहे.

पालघर जिल्ह्य़ातील ग्रामीण भागात करोना रुग्णांसाठी रुग्णालयात दाखल होण्यासाठी तयार करण्यात आलेल्या डॅशबोर्डवर माहिती दररोज अपडेट केली जात नसून डॅशबोर्डवर प्राणवायूच्या ५२५ खाटा उपलब्ध असल्याचे दाखवले असले तरी प्रत्यक्षात ३५३ शासकीय रुग्णालयात व १३२ प्राणवायू खाटा खाजगी रुग्णालयात अशा एकंदर ४८५ खाटा आहेत. त्यातही सध्या जेमतेम २०-२५ खाटाच रिक्त आहेत.

जिल्ह्य़ातील ग्रामीण भागात शासकीय आरोग्यव्यवस्थेतील दहा व खासगी रुग्णालयांत २१ अशा एकूण ३१ खाटांची व्यवस्था असून त्यातील एकही रिक्त नाही.

रुग्णशय्येचा पेच

कृत्रिम श्वसनयंत्रणेने सज्ज अशा ६७ खाटा असल्या तरी, त्या सध्या रुग्णांनी व्यापल्या आहेत. जिल्ह्य़ात विलगीकरण्यासाठी साडेसातशेहून अधिक खाटा उपलब्ध असून त्या ठिकाणी आजाराची सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना दाखल करण्याची सुविधा उपलब्ध असून काही करोना काळजी केंद्रांमध्ये निवडक प्राणवायू खाटांचा समावेश आहे. २५-३० लाखांची लोकसंख्या असणाऱ्या जिल्ह्य़ातील ग्रामीण भागात आरोग्य सुविधा अत्यल्प प्रमाणात असल्याने सर्वसामान्य नागरिकांना उपचारांसाठी मोठय़ा प्रमाणात खर्च करावा लागत असून अनेकांना जिल्ह्य़ाबाहेर उपचारांसाठी जावे लागत आहे.

जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागात मार्च महिन्यात १५२५१ रुग्णांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी १६७८ नागरिकांना (११ टक्के) संसर्ग झाल्याचे आढळून आले होते. तर एप्रिल महिन्यात ६३ हजार ४६८ संशयित रुग्णांची करोना तपासणी करण्यात येऊन त्यापैकी पंधरा हजार ९३७ (२५.११ टक्के) नागरिकांना आजाराचा संसर्ग झाल्याचे दिसून आले आहे. एप्रिल महिन्यातील ग्रामीण भागाचा मृत्युदर १.०३ इतका होता तर जिल्ह्य़ातील सरासरी मृत्युदर १.४० इतका नोंदविण्यात आला आहे.

जिल्ह्य़ात ग्रामीण भागात गेल्या २४ तासांत ४४१ नवीन रुग्ण आढळले असून त्यापैकी ३०६ रुग्ण पालघर तालुक्यातील आहेत. उपचाराधीन रुग्णांमध्ये पालघर तालुक्यात ४१४८, डहाणू तालुक्यात १०६८, जव्हार तालुक्यात ५८० तर इतर तालुक्यांत २०० ते ३५० रुग्णांचा समावेश आहे.