जालना जिल्ह्य़ातील दाभाडी व पापळ येथे रोजगार हमी योजनेखालील पाझर तलावांच्या कामात भ्रष्टाचार केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केलेल्या ७ आरोपींच्या ९ जामीन अर्जावर उद्या (मंगळवारी) येथील विशेष न्यायालयात सुनावणी होणार आहे.
बदनापूर तालुक्यातील दाभाडी व जाफराबाद तालुक्यातील पापळ येथे २००७ ते २००९ दरम्यान पाझर तलावांच्या कामात गैरप्रकार करून बनावट बिलांची अदायगी केल्याच्या आरोपावरून लाचलुचपत विभागाने २ मे रोजी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले. पाटबंधारे विभागाचे (स्थानिक स्तर) तत्कालीन कार्यकारी अभियंता रघुवीर यादव, तत्कालीन उपविभागीय अभियंता भास्कर जाधव, तत्कालीन शाखा अभियंता श्रीनिवास काळे व रामेश्वर कोरडे, तसेच राजेंद्र खोमणे, वसंत ढवळे, सुभाष देशपांडे (मजूर सहकारी संस्थांचे अध्यक्ष) हे सातजण आरोपी आहेत.
जालना येथील विशेष न्यायाधीश के. के. गायकवाड यांनी २० मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावल्यावर या सर्वानी जामिनासाठी अर्ज केला. सात आरोपी असले तरी जामिनासाठी एकूण ९ अर्ज आहेत. कारण यादव व जाधव हे अभियंते बदनापूर तसेच टेंभुर्णी पोलिसांत दाखल दोन्ही गुन्ह्य़ांत आरोपी आहेत. त्यामुळे त्यांचे जामिनासाठी प्रत्येकी दोन अर्ज आहेत. गेल्या शुक्रवारी जामिनासाठी अर्ज विशेष न्यायालयासमोर आले असता त्यावर मंगळवारी सुनावणीची तारीख देण्यात आली.