निसर्ग वादळाने आता महाराष्ट्राची किनारपट्टी ओलांडली असून हे वादळ आता थोडे ईशान्येकडे सरकू लागले आहे. दुपारी १२:३३ ते २:३० या काळात अलिबागला धडकलेल्या या वादळानं रौद्र रूप धारण केलं होतं. या काळात अलिबागला १०० ते ११० किमी प्रति तास या वेगानं वारे वाहू लागले होते. काही वेळा तर वाऱ्याचा वेग १२० किमी प्रति तास अशा भीतीदायक पातळीवर पोहोचला होता. दुपारी अडीच वाजता हे वादळ मुंबईपासून ७५ किमी अंतरावर तर तर पुण्याच्या पश्चिमेला ६५ किमी अंतरावर होतं. भारतीय हवामान खात्याकडून ही माहिती देण्यात आली आहे.

चक्रीवादळाची दिशा आता पनवेल, कर्जत, खोपोली, नाशिक या मार्गाने जाणार असल्याची माहिती डॉ. अनुपम कश्यपी, प्रमुख हवामान संशोधक, पुणे वेधशाळा यांनी दिली आहे. कुलाबा वेधशाळेचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी याआधी सांगितलं होतं की, “वादळाची लँडफॉल हेण्यास सुरुवात झाली असून ही संपूर्ण प्रक्रिया तीन तासांची असेल. रायगड पार करून मुंबई आणि ठाण्याच्या भागाकडे वादळ सरकत जाईल. सध्या अलिबागमध्ये जोर असून १२५ किमी प्रतितास वारे वाहत आहे’.

अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे तयार झालेले निसर्ग चक्रीवादळ अलिबाग जवळच्या किनाऱ्यावर धडकणार असल्याचा इशारा देण्यात आला होता. वादळापासून रक्षणासाठी बुधवार आणि गुरुवारी रोजी मुंबई व कोकण किनारपट्टीवरील कार्यालये-उद्योग बंद राहतील असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं होतं. तसंच दोन दिवस घरातच राहण्याचे आवाहनही केलं होतं.

निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान होऊ नये यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी तयारी करण्यात आली. निसर्ग चक्रीवादळात कोणतीही जीवीतहानी होऊ नये यासाठीही सर्व व्यवस्था करत लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे. महाराष्ट्रात राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (NDRF) २१ तुकड्या तैनात करण्यात आल्या असून आतापर्यंत त्यांनी १ लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं असल्याची माहिती एनडीआरएफचे व्यवस्थापकीय संचालक एस एन प्रधान यांनी दिली होती.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे यांना या कठीण प्रसंगी आम्ही तुमच्या पाठिशी असल्याचं म्हटलं आहे. “निसर्ग वादळाच्या पार्श्वभूीवर दिल्लीतील जनतेच्या वतीने महाराष्ट्रातील जनता आणि तुम्हाला पूर्ण पाठिंबा दर्शवत आहोत. महाराष्ट्रातील जनतेच्या सुरक्षेसाठी आम्ही प्रार्थना करत आहोत,” असं अरविंद केजरीवाल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.