रमेश पाटील

विक्रमगड तालुक्यातील १९ पाडय़ांवर भीषण टंचाईच्या झळा

विक्रमगड तालुक्यातील अनेक गावपाडय़ांत पाणीटंचाईची समस्या गंभीर झाली असून येत्या काही दिवसांत उन्हामुळे पाण्याचे स्रोत झपाटय़ाने आटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अनेक गावपाडय़ांवरील महिलांना रोजगार बुडवून दिवसभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

पावसाचा हंगाम जवळ आल्याने येथील शेतकरी पावसापूर्वी शेतीची बांध, बंधिस्ती, तसेच येथील दुर्गम भागांतील अनेक घरे ही मातरोंडांनी (पेंढा) आच्छादलेली असतात. पाऊस सुरू होण्यापूर्वी दरवर्षी नवीन मातरोंडे टाकून ही घरे नव्याने दुरुस्तीच्या कामांना सुरुवात झाली आहे. मात्र ही कामे बंद करून ग्रामस्थांना पाण्यासाठीच वणवण करावी लागत आहे. अनेक गावांमधील विहिरी आणि कूपनलिकांमध्ये पाण्याची पातळी खालावली आहे, तर अनेक ठिकाणच्या कूपनलिका आणि विहिरींनी तळ गाठला आहे.

विक्रमगड तालुक्यातील खांड आणि मोहो खुर्द येथील बंधाऱ्यातील पाणी झपाटय़ाने कमी होत चालले आहे. गेल्या ३० वर्षांत पहिल्यांदाच लघु प्रकल्पातील पाणी कमी झाल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले. विक्रमगड तालुक्यात देहजी, पिंजाल आणि तांबाडी या प्रमुख तीन नद्या आहेत. या नद्याची पात्रे कोरडीठाक पडली आहेत. तालुक्यात जेमतेम पुढील १५ ते २० दिवस पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे.  गाव-पाडय़ांत कूपनलिका नाहीत. प्रशासन त्यात हलगर्जीपणा करीत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. याशिवाय विहिरी बांधण्याचे कामे गतीने होत नसल्याबद्दल ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. विक्रमगड तालुक्यातील कवडास (खोरीपाडा) केव- शेलारआळी, सासेआळी, रावतेपाडा, वसुरी-सहारेपाडा, बास्ते-दिवेपाडा, बास्ते-गावठाण, टेटवाली-कातकरीपाडा, खुडेद-बिरारीपाडा, साखरे- डोंगरीपाडा, आपटी बुद्रुक- पऱ्हाडपाडा, दांडेकरपाडा, सारशी- तांबडमाळ, खडकी-रिंजडपाडा, तरेपाडा, सुकसाळे-सुरुमपाडय़ाला टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी प्रस्ताव आहे.

तालुक्यातील २७ गावपाडय़ांवर तीन टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे, उर्वरित टंचाईग्रस्त पाडय़ांचे प्रस्ताव पाठवविण्यात आले आहेत. लवकरच आणखी दोन टँकर सुरू होतील.

– मधुकर खुताडे, सभापती, पंचायत समिती विक्रमगड