काळीधोंड ग्रामस्थांच्या चिंतेत भर

कासा : जव्हार शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या जुन्या जव्हार ग्रामपंचायत हद्दीतील काळीधोंड गावात भीषण पाणीटंचाईला सुरुवात झाली आहे. त्यात अचानक विहीर जमीनदोस्त झाल्यामुळे नागरिकांच्या हालामध्ये अधिक भर पडली आहे.

गावातील लोकसंख्या ९३६ असून बाहेर गावाहून शिक्षण घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांंची संख्या ही ८७ आहे. अशी एकूण १०२३ नागरिकांना आणि गावातील जनावरांना पाण्याची आवश्यकता असते. पाण्याचा स्त्रोत नसल्याने ग्रामस्थांचे आणि जनावरांचे अतोनात हाल सुरू झाले आहेत.  गावातील ग्रामस्थ पूर्वीपासून गावापासून साधारण दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या विहिरीवरून  पाणी  आणून आपले गुजराण करीत होते.

परंतु मागील ऑक्टोबर महिन्यात ही विहीर अचानक जमीनदोस्त झाल्याने पाण्याची मोठी अडचण निर्माण झाली आहे. सद्यस्थितीत या गावातील महिलांना पाणी आणण्याकरिता जवळपास तीन किलोमीटर अंतरावर जावे लागत आहे.  रात्रीच्या सुमारासही  पाण्याचा शोध घ्यावा लागत आहे. त्याचा त्रास महिलांना सहन करावा लागत आहे.

जुनी जव्हार ग्रामपंचायत हद्दीत येत असलेल्या काळीधोंड गावातील पाणीपुरवठा विहीर ऑक्टोबर महिन्यांत अचानक जमीनदोस्त झाली असल्याने भीषण पाणीटंचाईला सुरुवात झाली आहे. गावातल्या नागरिकांना पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी जव्हार तहसीलदारांकडे मागणी केली आहे.  

-श्रावण खरपडे, ग्रामस्थ

काळीधोंड ग्रामस्थांचा पाणीपुरवठा होणेबाबतचा अर्ज कार्यालयात प्राप्त झाला आहे. टँकरमंजुरीकरिता प्रांताधिकारी,  जव्हार यांच्याकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे.  मंजुरी मिळताच टँकर सुरू करण्यात येतील.

-संतोष शिंदे, तहसीलदार, जव्हार