हर्षद कशाळकर

१२५ गावं आणि ३८६ वाडय़ांमध्ये तीव्र पाणीटंचाई, ८६ टँकरने पाणीपुरवठा

राज्यातील इतर भागांप्रमाणेच कोकणालाही पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांतील १२५ गावं आणि ३८६ वाडय़ांमध्ये सध्या पाण्याचे दुíभक्ष जाणवत आहे. जवळपास १ लाख ३८ हजार लोकांचे जीवन टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहे. ८६ टँकरच्या मदतीने या गावं आणि वाडय़ांना पाणीपुरवठा केला जात आहे. हंडाभर पाण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ येथील लोकांवर आली आहे.

कोकणात दरवर्षी पडणाऱ्या पावसाचा विचार केल्यास, संपूर्ण राज्याला वर्षभर पाणीपुरवठा करता येईल एवढा पाऊस एकटय़ा कोकणात पडतो. पण योग्य नियोजनाआभावी हे सह्याद्रीच्या पर्वतरांगांवरून घसरत थेट समुद्राला जाऊन मिळते. पावसाळ्यात दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या कोरडय़ा पडतात. आणि गाव, वाडय़ा वस्त्यांवर पाणीसमस्या निर्माण होते. सध्या याचाच प्रत्यय कोकणातील १२५ गावं आणि ३८६ वाडय़ांना येत आहे. यात ठाण्यातील ३९ गावं, १२९ वाडय़ा, पालघरमधील ३६ गावं ८७ वाडय़ा, रायगडमधील ३० गावं, १३० वाडय़ा, रत्नागिरीमधील २० गावं, ४० वाडय़ांचा समावेश आहे.

रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या तुलनेत ठाणे आणि पालघर जिल्ह्यांची परिस्थिती अधिकच बिकट आहे.

ठाण्यातील शहापूर आणि मुरबाड, पालघरमधील मोखाडा, जव्हार, वाडा आणि विक्रमगड, रायगड जिल्ह्यातील पेण, कर्जत, महाड पोलादपूर, रत्नागिरीतील खेड, चिपळूण आणि लांजा तालुक्यांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

आज आठवडय़ात एक दिवस काही ठिकाणी दोन दिवस या टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे हंडाभर पाण्यासाठी गावकऱ्यांवर संघर्ष करण्याची वेळ आली आहे. गेल्या वर्षी एप्रिलअखेर ९२ गावं आणि २३१ वाडय़ांमध्ये पाणी दुर्भिक्ष जाणवले होते. या वर्षीची परिस्थिती अधिकच बिकट आहे. दरवर्षी पाणीटंचाई निवारणासाठी शासनस्तरावर करोडो रुपये खर्च केले जातात. पाणी समस्या आहे तशीच राहते.

कोकणात का उद्भवते पाणी समस्या?

कोकणातील पाणी योजना या ठेकेदारीप्रधान आहेत. ठेकेदार सांगतात, अधिकारी आणि नेते मंजुरी देतात, चुकीच्या पद्धतीने योजना राबविल्या जातात. लोकांच्या हितापेक्षा ठेकेदाराचे हित जपले जाते हेच पाणी समस्येचे मूळ कारण आहे. जाणकारांच्या मते कोकणाला मोठय़ा धरणांची गरज नाही. तर लहान लहान धरणांची गरज आहे. पण मोठी धरणे बांधण्याकडे शासनाचा कल आहे.

विकेंद्रित जलव्यवस्थापनाची गरज..

मोठी धरणे ही खर्चीक असतात, त्यासाठी निधी वेळेत उपलब्ध होत नाही, त्यामुळे ती अपूर्ण राहतात, आणि ठेकेदार सोडला तर कोणाचा फायदा होत नाही. या उलट मोठय़ा धरणाच्या किमतीत नद्यांवर लहान लहान धरणे अथवा बंधारे घातले तर त्यासाठी येणारा खर्च कमी असेल, विकेंद्रित स्वरूपात पाणी अडवले जाईल, त्याचा फायदा आसपासच्या लोकांना होईल, साठलेले पाणी जमिनीत जिरल्याने भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ होऊ शकेल आणि पाणी समस्या कायमची निकाली निघेल.

–  मंगेश माळी, सामाजिक कार्यकत्रे