19 September 2020

News Flash

हंडाभर पाण्यासाठी वणवण

महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.

(संग्रहित छायाचित्र)

चिंचघरमध्ये भीषण पाणीटंचाई; श्रमजीवीचा सोमवारी पंचायत समितीवर मोर्चा

वाडा तालुक्यातील चिंचघर या गावातील विहिरी व कूपनलिकांनी (बोरवेल) पाण्याचा तळ गाठल्याने या संपूर्ण गावातील ग्रामस्थांवर भीषण पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. ग्रामपंचायत पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यात अपयशी ठरल्याने गावात टँकरने पाणीपुरवठा करावा या मागणीसाठी वाडा तालुका श्रमजीवी संघटनेने सोमवारी २५  मार्च रोजी वाडा पंचायत समितीवर मोर्चाचे आयोजन केले आहे.

चिंचघर गावात दोन हजारहून अधिक लोकसंख्या आहे. हे गाव औद्योगिक क्षेत्रात येते. या गावाच्या आजूबाजूला विविध वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या पन्नासहून अधिक कंपन्या आहेत. येथून एक किलोमीटर अंतरावर कुडूस ही मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे चिंचघर येथे स्थानिकांबरोबर भाडेकरूंची लोकवस्ती मोठय़ा प्रमाणावर आहे.

गावात नळपाणीपुरवठा योजना आहे. मात्र, पाणी पुरविणाऱ्या विहिरींनी पाण्याचा तळ गाठला आहे. त्यामुळे एक दिवसआड फक्त दोन तास पाणी सोडले जाते. या पाण्यासाठी महिलांची झुंबड उठते. गावातील विहिरीत झिरपणारे पाणी मिळविण्यासाठी महिलांना पहाटे उठून पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

गावालगत प्रियदर्शनी या कंपनीचा एक भलामोठा तलाव होता. हा तलाव कंपनीने बुजविल्यापासून गावातील विहिरी व बोरवेलच्या पाण्याने तळ गाठला असे येथील ग्रामस्थ सचिन पाटील यांनी सांगितले. वाडा पंचायत समितीच्या उपसभापती मेघना पाटील या चिंचघर याच गावच्या रहिवासी असून त्यांनी प्राधान्याने येथील पाणीटंचाईचा प्रश्न सोडवावा अशी मागणी श्रमजीवीचे जिल्हा सरचिटणीस विजय जाधव यांनी केली आहे.

दरम्यान येथील भीषण पाणीटंचाई सोडविण्यास येथील ग्रामपंचायत प्रशासनास अपयश आल्याने सोमवारी श्रमजीवी संघटना पंचायत समितीवर मोर्चा नेऊन गटविकास अधिकारी यांना जाब विचारणार असून चिंचघर गावात तातडीने टँकर सुरू करावा अशी मागणी करणार असल्याचे श्रमजीवी संघटनेचे तालुकाध्यक्ष जानु मोहनकर यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2019 12:27 am

Web Title: severe water shortage in the chinchghar
Next Stories
1 वनखात्याच्या कार्यालयावर ग्रामस्थांचा हल्ला
2 अंत्यविधीतील फुलांपासून खतनिर्मिती
3 वसई संग्रामातील हुतात्म्यांचे लवकरच स्मारक
Just Now!
X