News Flash

‘स्मार्ट सिटी’साठी सोलापुरात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प

१९३ कोटींचा निधी राज्य शासनाकडे जमा; प्रकल्पाचा खर्च एनटीपीसी उचलणार

१९३ कोटींचा निधी राज्य शासनाकडे जमा; प्रकल्पाचा खर्च एनटीपीसी उचलणार
‘स्मार्ट सिटी’ योजनेअंतर्गत सोलापूर शहरासाठी केंद्र सरकारकडून पहिल्या टप्प्यात १९३ कोटींचा निधी मंजूर होऊन राज्य शासनाकडे जमा झाला आहे. या पाश्र्वभूमीवर स्मार्ट सिटी योजनेच्या पहिल्या टप्प्यात सांडपाणी प्रक्रिया करणारा ‘टर्सरी’ प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पात प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा पुनर्वापर सोलापूरजवळील एनटीपीसीच्या औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पासाठी करण्याचा प्रस्ताव आहे. या प्रकल्पाचा खर्च एनटीपीसी उचलणार आहे.
याशिवाय घनकचरा व्यवस्थापनासह वाहनतळांची व्यवस्था आदी विविध आठ कामांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
स्मार्ट सिटी योजना राबविण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार स्थापित झालेल्या स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कंपनीच्या संचालकांची बैठक महापालिकेत झाली. या वेळी कंपनीचे अध्यक्ष तथा पालिका आयुक्त विजय काळम-पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी रणजितकुमार, पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर, महापौर प्रा. सुशीला आबुटे, पालिका स्थायी समितीचे सभापती रियाज हुंडेकरी, पालिका सभागृहनेते संजय हेमगड्डी, विरोधी पक्षनेते नरेंद्र काळे तसेच नगररचना विभागाचे सहसंचालक प्रकाश भुकटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता प्रवीण किडे (पुणे), क्रिसील कंपनीचे पार्थिव सोनी, सनदी लेखापाल आनंद गावडे, पालिकेच्या सहायक आयुक्त तथा कंपनीच्या कार्यकारी संचालिका अमिता दगडे-पाटील आदी संचालकांची उपस्थिती होती.
सोलापूरजवळ आहेरवाडी (ता. दक्षिण सोलापूर) येथे एनटीपीसीमार्फत सुमारे १३ हजार कोटी खर्चाचा औष्णिक ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारला जात आहे. या प्रकल्पासाठी उजनी धरणातून थेट जलवाहिनी योजनेतून वर्षांतून दोन टीएमसी पाणी उचलले जाणार आहे. या जलवाहिनी योजनेचे काम प्रगतिपथावर असतानाच इकडे सोलापुरातील पाणीपुरवठय़ाची स्थिती पाहता उजनी धरण ते सोलापूर समांतर जलवाहिनी योजना उभारणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने एनटीपीसी प्रकल्पासाठी उभारण्यात येणाऱ्या जलवाहिनी योजनेचा वापर सोलापूर शहराच्या पाणीपुरवठय़ासाठी करावा आणि त्या मोबदल्यात सोलापुरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याच्या पुनर्वापरासाठी टर्सरी प्रकल्प उभारण्याची आणि हे प्रक्रिया केलेले पाणी एनटीपीसी प्रकल्पासाठी देण्याची योजना शासनाने मान्य केली आहे. सोलापूरसाठी पाण्याची निकड पाहता हे काम प्राधान्याने हाती घेतले जाणार आहे.

आठ कामांना प्राधान्य
स्मार्ट सिटी डेव्हलपमेट कॉर्पोरेशन कंपनीच्या बैठकीत टर्सरी प्रकल्प प्राधान्याचे उभारण्याचे ठरले. उल्लेखनीय बाब म्हणजे या टर्सरी प्रकल्पासाठी होणारा खर्च एनटीपीसी उचलणार असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय स्वच्छ सोलापूरसाठी शंभर टक्के घनकचरा व्यवस्थापन करणे, वाहनतळांची व्यवस्था करणे, खुल्या जागा व उद्यानांचा दर्जा सुधारणे, ‘स्मार्ट टॉयलेट’ची सुविधा उभारणे इत्यादी आठ कामांना प्राधान्य देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2016 1:47 am

Web Title: sewage processing project in solapur
टॅग : Smart City
Next Stories
1 दुर्मीळ पांढऱ्या पाठीची १७ गिधाडे चंद्रपूरमुक्कामी
2 सरकारच्या अनास्थेने शेतकऱ्यांचा कणा मोडला
3 सावंतवाडी तालुक्यात पाणीटंचाई
Just Now!
X