राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे जन्मस्थळ विकासासाठी ८ कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी खर्च करण्यात येत आहे. याचे सत्तर टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम गतीने पूर्ण केले जाईल. हे काम आंतरराष्ट्रीय दर्जाचे करू. याव्दारे शाहू महाराजांचा इतिहास, कर्तृत्व, कार्य आणि विचार लोकांसमोर मांडलेजाणार आहे, असे प्रतिपादन सहकार तथा पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी येथे शाहू जयंतीच्या कार्यक्रमात केले. राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे जन्मस्थळ, लक्ष्मी विलास पॅलेस, दसरा चौकातील पूर्णाकृती पुतळा आदी ठिकाणी अभिवादन करण्यात आले. मंत्री, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी, नागरिक, शाहू प्रेमी यांच्या उपस्थितीत हे कार्यक्रम पार पडले.    
कसबा बावडा येथील लक्ष्मी विलास पॅलेस या शाहू जन्मस्थळी पालकमंत्री पाटील यांच्या उपस्थितीत अभिवादन सोहळा पार पडला. यावेळी कामगारमंत्री हसन मुश्रीफ, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष संजय मंडलिक, महापौर प्रतिभा नाईकनवरे, आमदार महादेवराव महाडिक, जिल्हाधिकारी राजाराम माने, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, पोलीस अधीक्षक विजयसिंह जाधव, महापालिका आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी आदी उपस्थित होते.यावेळी पालकमंत्र्यांनी जन्मस्थळ विकासकामांची पाहणी केली. वास्तुविशारद अमरजा निंबाळकर, पुरातत्त्व विभागाचे अधिकारी व्ही. आर. कांबळे यांच्याकडून माहिती घेतली. कामाचा दर्जा आंतरराष्ट्रीय असला पाहिजे, याबाबत सूचना केल्या. या कार्यक्रमावेळी शालेय विद्यार्थी, शिक्षक, शिक्षिका आवर्जून उपस्थित होत्या. शाहू महाराजांच्या वेशातील एक विद्यार्थी सर्वाचा लक्ष वेधून घेत होता. विद्यार्थ्यांनी शाहू महाराजांचा जयजयकार केला.     
दरम्यान दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पालकमंत्री पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. दसरा चौकातील पुतळा परिसर विद्युत रोषणाई व फुलांच्या तोरणांनी सजविण्यात आला होता. यानंतर श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते शोभायात्रेला प्रारंभ झाला. त्यामध्ये उपरोक्त सर्व मान्यवरांसह विविध संस्थांचे पदाधिकारी, शाहू प्रेमी नागरिक सहभागी झाले होते. मिरवणुकीत विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी राजर्षी शाहूंच्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटनांवर आधारित सादर केलेले चित्ररथ नागरिकांचे आकर्षण बनले होते.