शैलेश गोजमगुंडे हे नव्या पिढीतील अतिशय दमदार लेखक आहेत. आपल्या नाटय़लेखनातून सजग समाजमनाची जाणीव त्यांनी निर्माण केल्याचे प्रतिपादन मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष प्रा. फ. मुं. िशदे यांनी केले.
गोजमगुंडे लिखित ‘उंच माझा झोका गं व चार एकांकिका’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळय़ात शिंदे बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी खासदार रूपाताई निलंगेकर होत्या. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर, ज्येष्ठ रंगकर्मी श्रीराम गोजमगुंडे, लेखक शैलेश गोजमगुंडे, वनिता गोजमगुंडे व विवेक सौताडेकर उपस्थित होते. प्रा. िशदे म्हणाले, की लातूरला नाटय़लेखनाची परंपरा आहे. लातूर पॅटर्न निर्माण होण्याआधी लातूरच्या नाटय़क्षेत्रात गोजमगुंडे पॅटर्न होता. त्याचाच वारसा शैलेश गोजमगुंडे यांनी चालवला आहे. आजूबाजूच्या बारीकसारीक गोष्टींचे निरीक्षण करून त्यांनी शब्दबद्ध केले.
डॉ. विद्यासागर यांनी या एकांकिकेत संवेदनशील व्यक्तिमत्त्व प्रत्ययास येते. नाटक लिहिणे खूप अवघड आहे. एकाच वेळी अनेकांच्या मनाला भावणारे लिखाण करण्याची काळजी घेतली पाहिजे. एकांकिका लिहिणे तर त्यापेक्षाही अवघड आहे. समाजाच्या सर्व स्तरांतील समस्या गोजमगुंडे यांनी अतिशय संवेदनशीलपणे मांडल्या, असे सांगितले. विद्या प्रकाशनचे रवि जोशी यांनी प्रास्ताविक, तर बाळकृष्ण धायगुडे यांनी सूत्रसंचालन केले.