वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या पद्मावत चित्रपटाला आमचा विरोध नसून आशयाला आमचा विरोध नसल्याचे शालिनी ठाकरेंनी स्पष्ट केले. त्या क्षणापासूनच भन्साळींच्या ‘पद्मावत’ला मनसेचे सुरक्षा कवच मिळाल्याच्या चर्चा होत्या. पण, पक्षाकडून अशी कोणतीच भूमिका स्पष्ट करण्यात आली नसल्याचे वृत्त आता समोर येत आहे.

‘एबीपी माझा’च्या वृत्तानुसार मनसे चित्रपट सेना अध्यक्ष अमेय खोपकर यांनी हा मुद्दा स्पष्ट केला. शालिनी ठाकरे यांनी बहुचर्चित पद्मावती चित्रपटाबद्दल मांडलेल्या भूमिका म्हणजे केवळ त्यांची वैयक्तिक मतं असल्याचे खोपकर यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेकडून ‘पद्मावत’चा विरोध करण्यात आलेला नाही हे खरे असले तरीही या चित्रपटाला पक्षाने पाठिंबाही दिेलेला नाही, असे म्हणत खोपकर यांनी ‘पद्मावत’विषयी मनसेची भूमिका मांडली.

अमेय खोपकर यांनी केलेले हे वक्तव्य पाहता राज ठाकरेंच्या पक्षात अंतर्गत वादाला तोंड फुटल्याचे चित्र समोर आले आहे. मुळात चर्चेत असणाऱ्या पद्मावत वादाविषयी शालिनी ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिल्यानंतर त्यांचे वक्तव्य हे पक्षाच्या वतीनेच केले असल्याचे सांगत या चित्रपटाला मनसेने पाठिंबा दिला असून वेळ पडल्यास चित्रपटाला करणी सेनेपासून संरक्षणही देऊ, ही मनसेचीच भूमिका असल्याच्या चर्चा होत्या. पण, मुळात पक्षातर्फे असा कोणताच निर्णय किंवा अधिकृत वक्तव्य करण्यात आले नसल्याचे खोपकर यांनी स्पष्ट केले.

Padmaavat Review : आश्चर्याच्या परिसीमा ओलांडणारा ‘पद्मावत’

‘पद्मावत’ला सेन्सॉर बोर्ड आणि सुप्रीम कोर्टाने दिलासा दिलेला असतानाही करणी सेनेने त्याला विरोध करणं चुकीचं आहे, या सिनेमाच्या प्रदर्शनाला विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक देणं तर निश्चितच चुकीचे आहे, असे सांगत मनसेच्या सरचिटणीस आणि महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेच्या कार्याध्यक्षा शालिनी ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यासोबतच मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात ‘पद्मावत’ प्रदर्शित होण्यासाठी आवश्यकता भासल्यास मनसे सज्ज असेल, असेही त्यांनी सांगितले होते. पण, आता त्यांच्या या वक्तव्यावर खोपकर यांनी दिलेली प्रतिक्रिया पाहता मनसेमध्येच वादांचे घुमर सुरु असल्याचे मत अनेकांनी मांडले आहे.