शेतीमालास भाव देण्याच्या मागणीवर विरोध न करण्याचे वदवून घेतल्यानंतर शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेने आम आदमी पक्षासोबत आगामी लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. दोन आठवडय़ांपूर्वीच शेतकरी संघटना व आप यांच्यात समन्वय होण्याची शक्यता संघटनेचे ज्येष्ठ नेते वामनराव चटप यांनी ‘लोकसत्ता’शी बोलतांना व्यक्त केली होती.
 मात्र, शेतीमालास भाव मिळाल्याने होणाऱ्या महागाईविरोधात आंदोलन करणारी आप व त्याच मुद्दय़ावर स्वत:चे अस्तित्व जपणारी संघटना यांच्यात विरोधाभास दिसून येत होता. हीच बाब संघटना नेत्यांनी आपच्या नेत्यांपुढे मांडली. अखेर चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात संघटनेची भूमिका आपने मान्य केली आहे.
संघटना नेत्या सरोज काशीकर म्हणाल्या, आम्ही आपमध्ये प्रवेश केलेला नाही. केवळ जागावाटपाबाबत समन्वय केला असून आपच्या चिन्हावर आमचे उमेदवार
लढतील.
 चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून वामनराव चटप व नांदेडमधून गणपत पाटील हेच दोन उमेदवार उभे राहतील, असा खुलासा त्यांनी केला. शेतीमालाला भाव मिळण्याबाबत आग्रही राहण्याची संघटनेची भूमिका मान्य झाली, तसेच भ्रष्टाचारमुक्त भारत, महिलांची सुरक्षा व कायद्याचे राज्य, या तीन बाबींवर दोन्ही पक्षांचे एकमत आहेच. संघटनेचे पूर्वाश्रमीचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी पूर्वीच आपसोबत नाते जोडले आहे.या पाश्र्वभूमीवर संघटना नेते आपसोबत जाणार काय, असा संभ्रम कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला होता. मात्र, चटप यांनी आपसोबत मैत्री करतांना या बाबी किरकोळ असल्याची भूमिका घेतली होती.
काँग्रेस आघाडी व महायुतीसोबत जाण्याचे स्पष्टपणे नाकारणाऱ्या शेतकरी संघटनेने आपसोबत तडजोड होण्यात काही बाबी आड येण्याच्या पाश्र्वभूमीवर काही विदर्भवादी संघटनांसह निवडणुकीला सामोरे जाण्याची मानसिकता ठेवली होती, पण आपद्वारे शेतमालाच्या भावाबाबत सपशेल नांगी टाकण्याची भूमिका घेण्यात आल्याने संघटनेचे अखेर गंगेत घोडे न्हाल्याची प्रतिक्रिया आहे.