शेतकरी संपातून बाहेर पडण्याचा निर्णय शरद जोशीप्रणित शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल धनवट यांनी आज जाहीर केला. मात्र यापुढेही सरकारचे शेतकरी विरोधी धोरण बदलण्यासाठी संघटनेचा लढा सुरूच राहील, सरकारने काहीही न देता संप मोडून दाखवला यात मुख्यमंत्र्यांची चलाख व शेतकरी विरोधी खेळी यशस्वी झाली. मुळात संपातील अनेक मागण्यांशी संघटना सहमत नव्हती, परंतु शेतकरी हितासाठी संघटना त्यात सहभागी झाली होती. आता आंदोलन चिघळून त्यात शेतकऱ्यांच्या पोरांचा बळी जाऊ नये, असेच संघटनेला वाटते. सरकार आपला चार महिन्यांचा शब्द पाळते का ते पाहू. नाहीतर पुन्हा आंदोलन उभे करू, असे धनवट यांनी आज, शनिवारी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

संपात आता राजकीय पक्षांचा शिरकाव झाला आहे. शिवाय शेतक ऱ्यांच्या भावनिक उद्रेकातून पदरी फार काही पडेल, असे वाटत नाही. किसान क्रांतीची कर्जमुक्तीची मागणी वगळता इतर कोणतीही मागणी संघटनेला मान्य नव्हती, परंतु शेतक ऱ्यांची एकजूट होत आहे हे पाहून तात्त्विक मुद्दे सोडून संघटनेने संपाला पाठिंबा दिला. यानिमित्ताने शेतक ऱ्यांची डोळे दिपवणारी ताकद पाहावयास मिळाली. दोन, तीन दिवसांत सरकार शरण आले असते, योग्य तोडगाही निघाला असता, मात्र किसान क्रांतीच्या काही नेत्यांची कचखाऊ रणनीती व वैचारिक दौर्बल्य दाखवून शेतकरी चळवळीला खाली पाहायला लावले, असेच खेदाने म्हणावे लागेल, असे धनवट यांनी नमुद केले.

अभ्यास न करता आपल्या मागण्या पुढे करणारे अपरिपक्व नेतृत्व संपाला लाभले, त्यामुळे संपाच्या भवितव्याची काळजी संघटनेला वाटत होती. संपूर्ण कर्जमुक्ती प्रथम व नंतरच चर्चा अशी रणनीती असायला हवी होती, परंतु तसे घडले नाही. संप सर्व शेतक ऱ्यांनी पुकारला होता व मुठभर नेत्यांनी तो मागे घेतला, हे संघटनेला मान्य नाही. शेतकरी प्रश्न व शेतकरी आंदोलन शिखरावर असताना नेत्यांनी किरकोळ मुद्दय़ावरून तडजोडी करत माघार घेतली. धोरणात्मक बदल घडण्यासाठी कोणतीही चर्चा झालेली नाही. संपातील अनेक मागण्यांमुळे शेतकरी नवा वेठबिगार होईल, त्यामुळे किसान सभेच्याही अशा मागण्यांना आम्ही विरोध करतो, असे धनवट यांनी सांगितले.

दिलेली आश्वासने हे सरकार किती व कशी पाळते हे पाहून मगच संघटनेची पुढील आंदोलनाची दिशा ठरवावी लागेल, संप मागे घेतल्याची घोषणा केल्यानंतर संप सुरू ठेवणे अवघड असते. अनेक गुन्हे अंगावर घेण्यापलीकडे पदरात काही पडत नाही, त्यामुळे कार्यकर्त्यांनी आता दूध-भाजीपाला अडवणे बंद करावे, असेही आवाहन त्यांनी केले.