मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन; विधानसभेत पवारांचे अभीष्टचिंतन
शरद पवार यांच्या रूपाने देशाला पहिले मराठी पंतप्रधान मिळतील, असे बोलले जात होते, पण तसे घडले नसले तरी ते देशाचे नेतृत्व करण्यास सक्षम आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
फडणवीस यांनी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या अमृत महोत्सवानिमित्त विधाससभेत सोमवारी अभीष्टचिंतनाचा प्रस्ताव मांडला. ते म्हणाले, पवार यांना राज्यातील नव्हे, तर देशातील प्रत्यक्ष समस्यांची जाण आहे. त्यांनी आपली राष्ट्रीय नेता म्हणून प्रतिमा निर्माण केली आहे. शिस्त पाळण्यावर त्यांनी कायम भर दिला आहे. संसदीय मर्यादांचे काटेकोर पालन झाले पाहिजे, असा त्यांच्या आग्रह असतो. त्यांना राजकीय अस्पृश्यता मान्य नाही. देशातील एकमेव नेते आहे की, त्यांचे सर्वपक्षीय संबंध आहेत. त्यांचा विरोधकांकडे बघण्याचा दृष्टिकोन राजकीय शत्रू म्हणून नव्हे, तर राजकीय विरोधक, असा राहिलेला आहे. वंचित घटकाला केंद्रबिंदू मानून त्यांनी राजकारण केले आहे. त्यांनी नेहमी प्रागतिक विचार मांडला. काँग्रेस पक्षात लोकशाहीचा आग्रह धरत त्यांनी पक्ष काढला आणि तीन वेळा काँग्रेसह मिळून राज्यात सरकारदेखील स्थापन केली. प्रत्येक सरकारने काही ना काही चांगल्या गोष्ट केल्या आहेत. राजकीय विरोधक म्हणून आमचा त्यांना तात्त्विक विरोध टोकाचा आहे, पण आम्ही शत्रू नाही, असेही ते म्हणाले.
गोपीनाथ मुंडे आणि शरद पवार यांच्यातील राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा उल्लेख फडणवीस यांनी केला. सत्ता बदलात मुंडे यांची मोठी भूमिका आहे. पवार यांना विरोध करताना मुंडे यांनी अनेकदा सभागृह अक्षरश: डोक्यावर घेतले होते, पण त्यांनी राजकीय अस्पृश्यता कधी मानली नाही. ते अनेकदा एका व्यासपीठावर एकत्र आले होते. हे समृद्ध लोकशाहीसाठी आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.
पुरोगामी महाराष्ट्राच्या जडणघडणीत पवार यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्याशी आमचे वैचारिक आणि तात्त्विक मतभेद असले तरी मनभेद नाहीत. विरोधकांवर टीका करताना विषयाचा संदर्भ घेऊन टीका केली पाहिजे. व्यक्ती द्वेषातून भूमिका योग्य नाही. कोणत्याही मुद्दय़ांवर रचनात्मक चर्चा होऊ शकते, असे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.