नगर : विधानसभेच्या रिक्त झालेल्या अध्यक्षपदावरील निर्णय हा महाविकास आघाडीचा धोरणात्मक विषय आहे. त्यामुळे या विषयावर केवळ राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच निर्णय घेतील, असे शिवसेनेचे नगर विकास तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. या विषयावर बोलताना मंत्री शिंदे यांनी काँग्रेसचा नामोल्लेख टाळत, या पदाचा पवार व ठाकरे हेच निर्णय घेतील असे सांगितले.

विधानसभा अध्यक्षपद हे काँग्रेसकडेच होते, त्यामुळे या पदावर काँग्रेसच्याच व्यक्तीची नियुक्ती होईल, असे काँग्रेसचे नेते तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काल, गुरुवारी नगरमध्ये बोलताना स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते तथा नगरविकास मंत्री शिंदे यांनी नगरमध्येच काँग्रेसचा उल्लेख टाळत केवळ पवार व ठाकरे हेच निर्णय घेतील असे सांगितले. विधानसभा अध्यक्षपदावर शिवसेना दावा करणार का, या प्रश्नावर त्यांनी वरील उत्तर दिले. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) पुन्हा महाविकास आघाडीतील नेत्यांना नोटीस पाठवली आहे, याकडे लक्ष वेधले असता शिंदे म्हणाले, की ईडीसारख्या संस्थेचा वापर अशा पद्धतीने वारंवार केल्यास या संस्थेची विश्वासार्हता राहणार नाही. प्रकरण गंभीर असेल, त्यात तथ्य असेल तरच त्याचा वापर व्हावा. राजकीय सूडाच्या भावनेतून अशा नोटिसा पाठवल्या जाऊ नयेत.

औरंगाबादचे नामांतरण संभाजीनगर करावे ही जनतेचीच मागणी आहे. कोणाला औरंगजेबविषयी प्रेम असण्याचे काही कारण नाही. छत्रपती संभाजी महाराज हे राज्यातील जनतेच्या अस्मितेचा विषय आहे, असेही शिंदे यांनी यासंदर्भातील प्रश्नावर बोलताना सांगितले. अहमदनगरचे नामांतर करण्याची मागणी होत आहे, याकडे लक्ष वेधले असता शिंदे यांनी आम्ही जनतेबरोबर आहोत असे स्पष्ट केले.