शरद पवार यांची परिवर्तनाची हाक

भाजप सरकार मस्तवाल झाले आहे. सत्तेचा गैरवापर करून निवडणुका लढवल्या जात आहेत. सामान्यांची फसवणूक करणाऱ्या सरकारला सर्वानी एकजुटीने धडा शिकवण्याची वेळ आली आहे. नागरिकांना परिवर्तन हवे आहे व चांगला पर्यायही हवा आहे. सरकारच्या मस्तवालपणाला जनताच उत्तर देईल, असे भाकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी वर्तवले. नवी मुंबईतील विष्णुदास भावे नाटय़गृहात झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते.

कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक राष्ट्रवादीचे उमेदवार नजीब मुल्ला लढवत आहेत, या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादी, काँग्रेस, शेकाप, आरपीआय कवाडे गट, सपा यांच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी संयुक्त मेळावा आयोजित केला होता. त्यात शरद पवार यांनी भाजप सरकारवर हल्ला चढवला.

पवार म्हणाले, देशातील सर्वच राज्यांतील शेतकरी त्रासलेले आहेत. त्यामुळे रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. कष्टाने कमावलेले दूध व शेतमाल रस्त्यावर फेकू नका, अशी विनंती शेतकऱ्यांना केली आहे. देशात परिवर्तनाची हाक दिली असून सर्वच पक्ष एकत्र येत आहेत. कर्नाटकात ऐन निवडणुकीच्या काळात सत्तेचा वापर करून काँग्रेसच्या अनेक उमेदवारांच्या घरांवर छापे टाकण्यात आले. कर्नाटकच्या जनतेने भाजपला धडा शिकवला असून आज तेथे काँग्रेस व देवेगौडांचे सरकार स्थापन झाले आहे. दुसरीकडे सामान्य कुटुंबातून आलेल्या ममता बॅनर्जी या आजही साध्या घरात राहत असून त्यांनी सामान्यांसाठी काम करत भाजपची डाळ शिजू दिलेली नाही, म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यांच्या घरांवर छापे टाकण्यात आले, अशी टीका पवार यांनी केली.

देशाचे माजी अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी दिलेले योगदान विसरत त्यांच्यावर खटला भरून त्यांना चौकशीत अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. टाटा उद्योग समूहाद्वारे टाटा ट्रस्टच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी कामे केली जात असताना त्यांच्या अधिकाऱ्यांच्या घरांवर छापे टाकले जात आहे, असा आरोपही पवार यांनी या वेळी केला.

पालघर, भंडारा, गोंदिया येथील निवडणुकीत सत्तेचा वापर करून कसा घोळ घातला हे सर्वानी पाहिले आहे. बँकांना निवडणुकीच्या दोन दिवस आधी सुटी असतानासुद्धा सरकारी पैशाचे वाटप लाभार्थीना सुटीच्या दिवशी करण्यात आले. उन्हामुळे ईव्हीएम मशीन बंद पडल्याचे पहिल्यांदाच ऐकले असून संबंधित यंत्रणांना हाताशी धरून निवडणुका लढविल्या जात आहेत. त्यामुळे याबाबत लेखी तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे. निवडणूक आयोगाला बाहुले बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे, याबाबत न्यायालयीन लढा दिला जाईल, असे संकेत पवारांनी दिले.

वाशीत झालेल्या मेळाव्याला विविध राजकीय पक्षांचे मान्यवर उपस्थित होते. त्यामुळे यापुढील सर्वच निवडणुका एकजुटीने लढण्याचे संकेत या निमित्ताने अनेकांनी आपल्या भाषणातून दिले.

राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या तोंडी ‘साम, दाम, दंड, भेद वापरून निवडणुका जिंका,’ अशी भाषा शोभत नाही. सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांविरोधात जनता एकत्र येईल आणि सत्ताधाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय  राहणार नाही.

शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस