सुशांत सिंह राजपूत प्रकरणी शरद पवारांनी भाष्य केलं आहे. सुशांत सिंहची आत्महत्या राहिली बाजूला आणि इतरच गोष्टी समोर येत आहेत. चौकशी करणाऱ्या यंत्रणा लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवू पाहात आहेत का? अशी शंका घेण्यासारखी अवस्था आहे असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. आम्ही वाचलं होतं की एका कलाकारांनी आत्महत्या केली. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करत होते मात्र केंद्र सरकारचा त्यांच्यावर विश्वास दिसत नाही म्हणून त्यांनी हा तपास वेगळ्या एजन्सीकडे दिला. या एजन्सीने काय दिवे लावले त्याचा प्रकाश काही आम्हाला बघायला मिळालेला नाही. त्यामुळे आता भलतीकडेच सगळं चाललंय. सत्य कधी बाहेर येईल त्यावेळेला कळेल असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने १४ जूनला त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली. यानंतर बॉलिवूडच्या कंपूशाहीमुळे त्याचा बळी गेला आहे अशी टीका होऊ लागली. अभिनेत्री कंगना रणौतने तर सुशांतचा मृत्यू हा आत्महत्या नसून खून आहे असं वक्तव्य केलं. तसंच घराणेशाही आणि कंपूशाही यामुळे सुशांतला आत्महत्या करावी लागली असंही म्हटलं. या संदर्भातल्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्येही झळकल्या. ज्यानंतर या प्रकरणी मुंबई पोलिसांनी लक्ष घालून तपास सुरु केला. मात्र यावरुन राजकारण चांगलंच रंगलं होतं. भाजपाने केलेल्या मागणीवरुन हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं.

या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला तेव्हा चौकशी दरम्यान बॉलिवूड आणि ड्रग्ज प्रकरणही समोर आलं. या प्रकरणात दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सिमोन खंबाटा, सारा अली खान या बड्या अभिनेत्रींची नावं समोर आली. ज्यानंतर एनसीबीने या सगळ्यांचीही चौकशी सुरु केली. दरम्यान या सगळ्या बाबत शरद पवार यांना विचारलं असता “सुशांत सिंहची आत्महत्या राहिली एका बाजूला आणि इतरच गोष्टी समोर येत आहेत. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या यंत्रणा मूळ मुद्द्यापासून लक्ष दुसरीकडे वळवू पाहात आहेत का? अशी शंका घेण्यास जागा आहे” असं पवार यांनी म्हटलं आहे.