शरद पवार यांची सूचना; राजकीय परिस्थिती पाहता सामंजस्य गरजेचे

महानगरपालिका तसेच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेसबरोबर जायचे की नाही याचा अजून निर्णय झालेला नाही. मात्र सद्य:स्थिती पाहून सामंजस्याने विचार केला जाणार असेल तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस या निवडणुका एकत्र लढण्याचा विचार करतील, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

पवार म्हणाले, की गेल्या काही निवडणुकांचे निकाल पाहता आता या दोन्ही काँग्रेसने एकत्रित निवडणुका लढविण्याची गरज आहे. याबाबत दोन्ही पक्षांनी सामंजस्याने विाचर करत निर्णय घेणे अपेक्षित आहे. आगामी महानगरपालिका तसेच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेसबरोबर जायचे की नाही याचा आमच्या पक्षाचा निर्णय अजून झालेला नाही. पण लवकरच दोन्ही पक्षांच्या पातळीवर तो चर्चा करत घेतला जाईल.

नोटाबंदीबाबत सुरुवातीस अभिनंदन करणाऱ्या पवारांनी या निर्णयावर टीका करत मोदींचा हा निर्णय देशहिताचा नसल्याचा आरोप या वेळी केला. ते म्हणाले, की पंतप्रधान मोदी यांनी काळा पसा बाहेर काढण्यासाठी मोठय़ा मूल्याच्या नोटाबंदीचा निर्णय घेतला. देशहितासाठी आम्ही या निर्णयाला पािठबाही दिला होता. मात्र दिवसेंदिवस चित्र भयावह झाले. औद्योगिक आणि कृषी क्षेत्रालाही याचा मोठा फटका बसला आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका तसेच सहकारी बँकांबाबत घेतलेले निर्णय तर चुकीचे होते. ग्रामीण अर्थव्यवस्था त्यामुळे ढासळली. पी. चिदंबरम यांच्या नेतृत्वाखाली तसेच माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्याशी चर्चा करून आम्ही पंतप्रधान, अर्थमंत्र्यांना भेटून जिल्हा मध्यवर्ती बँक तसेच सहकारी बँकांवरील र्निबध उठवण्याची मागणी केली. सहकारी बँकांना दर दिवशी पंचवीस कोटी रुपयांची गरज असताना आठवडय़ाला केवळ २० कोटी मिळत होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न अधिक बिकट झाले.

विधान परिषदेच्या सातारा – सांगली गटात राष्ट्रवादीचे शेखर गोरे यांच्या पराभवाबाबत बोलताना ते म्हणाले, मला हा निकाल धक्कादायक होता. या निकालाचा शोध घेतला तेव्हा समजले, कमी-अधिक प्रसादाचे वाटप या निवडणुकीत झाले होते.

दरम्यान, सातारा जिल्ह्य़ाात राष्ट्रवादीशी सवतासुभा असलेले खासदार उदयनराजे भोसले यांच्याबद्दल पवार काय बोलणार याकडे सगळय़ांचे लक्ष होते. शरद पवार यांनी उदयनराजे आणि ते स्थापन करत असलेल्या आघाडीसंदर्भात एकही शब्द उच्चारला नाही, मात्र या वेळी रामराजे िनबाळकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खा. उदयनराजे भोसले यांच्या विरोधात सडकून टीका करत त्यांच्या दहशतीला आम्ही घाबरत नसल्याचे सांगितले.