भाजपा प्रणित सत्ता नसलेल्या राज्यांकडून केंद्र सरकारवर दुटप्पीपणाची टीका होताना दिसून येते. त्यातून केंद्र आणि राज्य असा वादही अनेक वेळा रंगताना बघायला मिळतो, याच राज्य-केंद्र सत्ता संघर्षाबद्दल सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रश्न विचारला. त्यावर शरद पवार यांनी नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असतानाचा एक किस्सा सांगून यावर भाष्य केलं.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची विशेष मुलाखत सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतली. या मुलाखतीचा अखेरचा भाग आज प्रसिद्ध झाला. या भागात शरद पवार यांनी राजकीय विषयांवर प्रामुख्यानं भाष्य केलं. तसेच सत्तेत असलेल्या भाजपालाही काही सल्ले दिले. राऊत यांनी “ममता बॅनर्जी यांचा आरोप नेहमी असतो आणि असे अनेक नेते आहेत की, मोदी सरकार कायम आमच्याशी सूडानं वागतंय. म्हणजे त्यांच्या विचारांची सरकार ज्या राज्यात नाही, त्यांच्याशी नीट वागायचं नाही किंवा त्यांना त्रास द्यायचा. विरोधी पक्षाची सरकार टिकू द्यायची नाही. फोडाफोडी करायची, याचं ताजं उदाहरण म्हणजे मध्य प्रदेश. तर अशा प्रकारे ज्याला सत्तेचा गैरवापर आपण म्हणतोय, तो होतोय का?”, असा प्रश्न पवारांना विचारला.

आणखी वाचा- पंतप्रधान नरेंद्र मोदी सूडाचं राजकारण करतात, शरद पवारांचा आरोप

या प्रश्नावर बोलताना शरद पवार म्हणाले,”सरळ सरळ होतोय. म्हणजे मी असं बघितलंय की, मनमोहन सिंगांच्या सरकारमध्ये मी होतो. मनमोहन सिंगांचं सरकार असताना नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी काही राज्ये ही भाजपाकडे होती. अनेकदा आम्ही असं बघायचो, मुख्यमंत्र्यांची परिषद असेल, सगळ्या मुख्यमंत्र्यांची, तर त्याच्या आदल्या दिवशी किंवा दोन दिवस आधी यांची वेगळी बैठक असायची. ते समजू शकतो. त्या पक्षाच्या सरकारच्या, मुख्यमंत्र्यांनी वेगळी बैठक घेतली. पण त्या बैठकीचं नेतृत्त्व नरेंद्र मोदी यांच्याकडे असायचं. त्या बैठकीतलं त्यांचं भाषण इतकं कठोर असायचं डॉ. मनमोहन सिंग यांच्याबद्दलच की ते विचारू नका. मग नंतर बैठकीला यायचे अन् त्यात त्यांचे प्रश्न मांडायचे. तो त्यांचा अधिकार आहे. त्याच्यावर माझं काही म्हणणं नाही. पण देशाच्या पंतप्रधानांबद्दल राज्याचा एक मुख्यमंत्री इतकी टोकाची भूमिका मांडतो. हे आम्ही त्याचवेळी पहिल्यांदा पाहिलं. याच्या आधी कधी घडत नव्हतं. आज यांच्या उलटी परिस्थिती आहे. आज काही राज्य त्यांच्या बरोबर नाहीत. तरीही त्यांनी अशी टोकाची भूमिका कधी घेतली नाही.

आणखी वाचा- “प्रियंका गांधींना निवासस्थान सोडायला सांगणं हे मोदी सरकारचं क्षुद्र राजकारण”

आणखी वाचा- शरद पवारांनी उलगडला ‘ऑपरेशन कमळ’चा अर्थ

उलट मनमोहन सिंगांनी कधी आपल्यावर टीका करतात म्हणून गुजरातच्या बाबतीत वेगळी भूमिका घेतली नाही. मी शेती खात्याचा मंत्री होतो, मला सतत सगळ्या राज्यात जायला लागायचं, उत्पादन वाढवायला. मी गुजरातमध्ये सुद्धा बराच त्यावेळी फिरलो. नरेंद्र मोदी यांच्या बरोबरीनं मी गुजरातमध्ये फिरलो. त्यावेळेला काँग्रेसमधील काही मंत्र्यांनी आमच्या मंत्रिमंडळात टीका केली की, मोदी एव्हढी टीका करतात आणि आपले मंत्री त्यांना मदत करताहेत. तेव्हा मनमोहन सिंग यांनी बैठकीत सांगितलं होतं की, ‘गुजरात हा या देशाचा भाग आहे. आपण सगळे भारतातील सर्व राज्यांच्या हितांची जपणूक करण्यासाठी इथं बसलो आहोत. त्यामुळे शरद पवार जे करत आहेत, ते बरोबर आहे आणि त्यांनी हे केलं पाहिजे.’ हे धोरण आणि आज आम्ही हे बघतोय की, याचं सरकार पाड… आता राजस्थानच्या सरकारमध्ये काही करता येईल तर कर… या सगळ्या चर्चा आहेत,” असं सांगत पवार यांनी सध्याच्या भाजपाच्या राजकारणावर टीका केली.