गेल्या ४० वर्षांत सर्व सत्तास्थाने निलंगेकर कुटुंबीयांकडे असूनही निलंगा विकासापासून वंचित आहे. बारामतीप्रमाणे निलंग्याचा विकास झाला का? विकास कसा असतो ते बारामतीला येऊन पाहा, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
निलंगा येथील राष्ट्रवादीचे उमेदवार बसवराज पाटील नागराळकर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत पवार बोलत होते. महाराष्ट्र आजही गुजरातपेक्षा पुढे आहे. लोकसभा निवडणुकीत रामदास आठवले, राजू शेट्टी, महादेव जानकर यांना मंत्रिपदे देतो, म्हणून या समाजाची मते मिळविली. परंतु केंद्रात सत्ता आल्यानंतर त्यांना मंत्री केले नाही. आता पुन्हा विधानसभा निवडणुकीत जिल्हय़ातील भाजपच्या सर्व उमेदवारांना मंत्री करतो, म्हणून भाजप नेते व मंत्री मते मागत आहेत. पण भाजप म्हणजे बोलायचे एक व करायचे दुसरे असा पक्ष आहे. जिल्हय़ातील राष्ट्रवादीचे उमेदवार विविध समाजघटकांचे प्रतिनिधित्व करतात. मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळेच शेतीमालाचे भाव गडगडले. परदेशातील काळा पसा आणू, असे म्हणून सोशल मीडियाच्या माध्यमातून मार्केटिंग करून केंद्रात सत्ता मिळविली. परंतु जनतेला अच्छे दिन आलेच नाहीत, अशी टीका पवार यांनी केली. उमेदवार नागराळकर, राजेश्वर बुके यांनी भूमिका मांडली. आमदार विक्रम काळे, डी. एन. शेळके, विलास माने, रणजित हलसे, महंमद रफी, अॅड. हरिभजन पौळ आदी उपस्थित होते.