News Flash

देशात एकाधिकारशाही वाढीला लागली, शरद पवारांची तिखट शब्दात टीका

शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण मागील तीन वर्षात सर्वाधिक

शरद पवार (संग्रहित छायाचित्र)

केंद्रात एकाधिकारशाही वाढीला लागली आहे. लोकांचे मूलभूत अधिकार आणि हक्क यावर गदा येते आहे. अत्यंत चिंताजनक वातावरण सध्या भारतात आहे. लोकसभा निवडणुकांच्या आधी देशाच्या जनतेला भरमसाठ आश्वासने देण्यात आली. मात्र प्रत्यक्षात सरकारविरोधात नाराजीचा सूर आता निघतो आहे कारण एकही आश्वासन पूर्ण झालेले नाही, अशी  टीका करत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. रायगड जिल्ह्यातील कर्जत या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन शिबीरात त्यांनी ही टीका केली.

वाढत्या शेतकरी आत्महत्यांवरून त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर टीका केली. मागील तीन वर्षांमध्ये महाराष्ट्रासह देशभरात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने या आत्महत्या होत आहेत आणि महागाईही वाढली आहे. शेतकरी आत्महत्यांचा आलेख उंचावतोय हे दुर्दैवी आहे, असेही पवार यांनी आपल्या भाषणात म्हटले.

शेतकरी कर्जमाफीवरून तर सरकारने क्रूर थट्टा सुरु केली आहे. कर्जमाफी केल्याचे बॅनर पाहिले . पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हाती काहीही आले नाही. ‘मी लाभार्थी हे माझे सरकार, कामगिरी दमदार’ असल्या जाहिराती हे सरकार करताना दिसते आहे. वास्तव मात्र शेतकऱ्याची फसवणूक हेच आहे. आपण जाहिरात करायची ठरवली तर ‘मी अपमानित’ असे शेतकरी म्हणताना दाखवावा लागेल कारण या सरकारने शेतकऱ्याचा अपमानच केला आहे. जाहिरातीतले शेतकरी नाही तर सत्तेच्या खुर्चीवर बसलेले ‘लाभार्थी’ झाले आहेत, असाही टोला शरद पवारांनी लगावला.

महत्त्वाच्या सगळ्या वर्तमान पत्रांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच जाहिराती दिसतात. वृत्तपत्र क्षेत्रालाही मंदीची झळ बसली आहे. माझ्या लहान भावाकडूनच मला या वृत्तपत्र व्यवसायातील मंदीबाबत समजत असते. मात्र पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या जाहिराती येत असल्यामुळे वृत्तपत्र व्यवसाय टिकला आहे असे पवारांनी म्हणताच एकच हशा पिकला. शेतकऱ्यांच्या हाती पैसा आलाच नाही त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांनी काळी दिवाळी साजरी केली. मंदी आल्यामुळे अनेकांचे रोजगार गेले. व्यापारी वर्गालाही याचा मंदीचा फटका बसला अशीही टीका शरद पवारांनी केली.

वाढत्या रेल्वे अपघातांवरही शरद पवारांनी चिंता व्यक्त केली. सुमारे ६५ लाख लोक मुंबईच्या लोकलमधून दररोज प्रवास करतात. दिवसाला १० लोकांचा जीव जातो आणि साधारण तितकेच लोक जखमी होतात. मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी काय उपाय योजना करण्यात आल्या आहेत ? असाही प्रश्न शरद पवारांनी त्यांच्या भाषणात उपस्थित केला.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 7, 2017 8:15 pm

Web Title: sharad pawar criticized central and state government
टॅग : Sharad Pawar
Next Stories
1 राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या गणवेशासाठी दहा कोटींचा निधी
2 पोलिसांना गुंगारा देऊन सांगलीत दोन आरोपी पसार
3 आरक्षण बदलले तर सरकार बदलेल!
Just Now!
X