राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची टीका

श्रीरामपूर : सत्तेबाहेर असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते पक्षांतर करीत आहेत. भारतीय जनता पक्षाकडून त्यांचा कोणता वैयक्तिक विकास केला जाणार आहे त्याची मला कल्पना नाही, असा टोमणा मारत सामान्य माणसाला हे पक्षांतर रुचलेले नसून निवडणुकीत संधी मिळेल तेव्हा ते प्रतिक्रिया  देतील, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी स्पष्ट केले.

रयत शिक्षण संस्थेच्या बोरावके महाविद्यालयातील कार्यक्रमानंतर पत्रकार परिषदेत पवार बोलत होते.  ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पक्ष सोडत नाहीत तर नेते पक्ष सोडत आहेत. माझ्या सार्वजनिक जीवनात हे पहिल्यांदाच घडत आहे, असे नव्हे तर यापूर्वी निवडून आलेले ६० आमदारांपैकी ५२ आमदार पक्ष सोडून गेले होते. पण माझा राज्यातील जनतेवर विश्वास होता. मी कष्ट घेतले. निवडणुकीत पुन्हा सरकार आले. आता काही नेते पक्षांतर करत आहेत.  लोकशाहीत निर्णय घेण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. त्यांच्या जाण्याने कोणीही एकटे पडत नाही. सत्तेबाहेर राहाणे त्यांना अडचणीचे वाटते. त्यामुळे भाजपाचे त्यांनी कौतुक सुरू केले आहे.

ईव्हीएम मशीनसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना पवार म्हणाले, लोकसभा निवडणुकीत मशीन घोटाळा झाला आहे. त्याची कागदपत्रे आमच्याकडे आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांनी मशीनने निवडणुका होणार असतील तर बहिष्कार घालण्याचा सल्ला दिला होता. पण राजकीय पक्षाला निवडणुकांना सामोरे जावेच लागते. त्यामुळे ते शक्य नाही, असे पवार म्हणाले.

मराठवाडय़ातील सर्व धरणे जलवाहिनींना जोडण्याचा तसेच पश्चिम घाटातील वाहून जाणारे पाणी उपसा योजना राबवून वळविण्याचा प्रचार केला जात आहे. त्याकरिता यापूर्वी अभ्यास झाला आहे. उपसा योजनांकरिता लागणारी वीज व पैसा राज्याकडे नाही. त्याकरिता जलतज्ज्ञांची समिती नेमून निर्णय घ्यावा. काश्मीरमध्ये अमित शहा यांनी केलेले ध्वजवंदन, ३७० कलम रद्द करणे आदी प्रश्न उपस्थित करून दुष्काळ, पूर, शेतमालाचे भाव, औद्योगिक मंदी, शेतकरी आत्महत्या यापासून लोकांचे लक्ष वळविले जात आहे, असा आरोपही पवार यांनी केला.

पवार संतप्त

राष्ट्रवादीचे नेते पक्ष सोडून चालले आहेत. त्यात तुमचे नातेवाईक पद्मसिंह पाटील यांचाही समावेश आहे, असा प्रश्न एका वाहिनीच्या पत्रकाराने करताच  पवार  भडकले. ही सभ्यता नाही. तुम्ही माफी मागा. अन्यथा चालते व्हा, असे त्यांनी त्या पत्रकाराला सुनावले. ते स्वत:ही निघून जाण्याच्या तयारीत ते होते. मात्र नंतर राष्ट्रवादीचे अविनाश आदिक व ज्येष्ठ पत्रकारांच्या मध्यस्थीनंतर त्यावर पडदा पडला. माजी आमदार चंद्रशेखर कदम हे भाजपाचे आहेत. ते माझे नातेवाईक आहेत. ते इथे आले आहेत. राजकारण आणि नाते म्हणून येथे कोणी एकत्र आले आहेत काय? असा सवाल करत अनेकांचे नातेवाईक वेगवेगळ्या पक्षात असतात. राजकारणात नातेगोते मी पाहत नाही. पद्मसिंह पाटील हे माझे मित्र आहेत, असेही ते म्हणाले.