राज पुरोहित यांच्या वक्तव्यांमुळे भाजपमध्ये अंतर्गत पातळीवर मोठ्याप्रमाणावर असलेली खदखद समोर आल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. ते शनिवारी औरंगाबाद येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. राज पुरोहित यांच्यासारखा विधिमंडळात इतकी वर्षे काम केलेला नेता जेव्हा अशाप्रकारचे निष्कर्ष काढतो, त्याविषयी विचार केला पाहिजे. या सगळ्यावरूनच पक्षाची दिक्षा स्पष्ट होत असल्याचा टोलाही पवार यांनी भाजपला लगावला. केंद्रीय पातळीवरही यशवंत सिन्हा, लालकृष्ण अडवाणी यांच्यासारख्या अनुभवी नेत्यांनी केलेली विधाने गांभीर्याने घेणे गरजेचे असल्याचे पवार यांनी सांगितले. तसेच देशात मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता नसली तरी महाराष्ट्राबाबत स्पष्टपणे काही सांगता येणार नाही, असे सूचक विधानही यावेळी पवार यांनी केले.