रोहा येथील सत्कार सोहळ्यात शरद पवार यांचे उद्गार

माझा सत्कार करण्यापेक्षा जनतेचा करा. आपल्याला सामान्य माणसांशी बांधिलकी ठेवायची आहे. संकटांवर त्यातूनच मात करता येते अशा आशावाद राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला पवार यांच्या संसदीय कारकीर्दीला ५० वर्षे झाल्यानिमित्त रोहा येथे त्यांचा सत्कार करण्यात आला.

महाराष्ट्राची शक्ती आम्हा सर्वाच्या पाठीशी राहते तेव्हा मराठी माणूस छातीचा कोट करून लढण्यास सिद्ध होतो. म्हणून या जनतेचा सन्मान व्हायला हवा. मी त्यांच्यासमोर कायम नतमस्तक होतो, असेही शरद पवार यांनी सांगितले. सामान्य व्यक्तीच्या जीवनात परिवर्तन येईल असा प्रयत्न केला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन शक्ती एकत्र आल्या तर देशाला दिशा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पवार यांच्या वाटचालीचा आढावा घेतला. या कार्यक्रमापूर्वी कुंडलिक नदीच्या संवर्धन कार्यक्रमाचे भूमिपूजन शरद पवार यांच्या हस्ते झाले.