सोलापुरात करोना विषाणूचा प्रादुर्भाव प्रचंड प्रमाणात वाढला असताना अखेर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार सोलापुरात येत आहेत. आज (रविवार) दुपारी शरद पवार हे दोन तास आढावा बैठक घेऊन करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने हाती घेतलेल्या उपाययोजनांची माहिती जाणून घेणार आहेत. त्यांच्या समवेत आरोग्यमंत्री राजेश टोपे व पालकमंत्री दत्तात्रेय भरणे हे उपस्थित राहणार आहेत.

सात रस्त्यावरील नियोजन भवनात दुपारी एक वाजता होणाऱ्या एका बैठकीत शरद पवार हे स्थानिक आमदार, खासदारांसह महापौर व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांची बैठक घेऊन करोनाच्या संदर्भात प्रशासकडून होत असलेल्या उपाययोजनांबाबत त्यांची मते आणि सूचना जाणून घेणार आहेत. त्यानंतर प्रशासनाची आढावा बैठक होणार आहे. या बैठकीत येत्या काळात करोना रोखण्यासाठी आणखी काय उपाययोजना करता येतील ? प्रशासनाच्या अडचणी काय आहेत, याचीही चर्चा पवार करणार आहेत.

या अगोदर आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री अनिल देशमुख, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, जलसंपदामंत्री जयंत पाटील आदींनी सोलापुरात येऊन करोना भयसंकट दूर होण्याच्या दृष्टीने आढावा बैठका घेतल्या होत्या. पालकमंत्री भरणे हे सोलापूरकडे लक्ष ठेवून आहेत. परंतु तरीही परिस्थिती आटोक्यात न येता हाताबाहेर जात आहे.

सोलापूर शहराच्या बरोबरीने आता जिल्ह्यातील ग्रामीण भागातही करोना विषाणूचा कहर वाढला आहे. आतापर्यंत पाच हजारांपेक्षा करोनाबाधित रूग्ण सापडले आहेत. तर मृत्युचा आकडाही ३६० च्या पुढे गेला आहे. करोनाची साखळी तोडण्याचे प्रशासनासमोरचे आव्हान अद्याप कायम आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या आढावा बैठकीकडे सोलापूरवासियांचे लक्ष लागले आहे.