निवडणुकांमध्ये पसे वाटून विजय मिळविण्याची सवय शरद पवार यांना आहे. यंदा निवडणूक आयोगाने ताणून धरल्यामुळे ते व्याकूळ झाले आहेत. पराभवाची धास्ती त्यांना वाटत आहे. त्यामुळेच पवार निवडणूक आयोगाबाबत आगपाखड करीत असल्याचा आरोप शिवसेनेचे नेते आमदार दिवाकर रावते यांनी केला. रविवारी पत्रकार बैठकीत ते बोलत होते.
रावते म्हणाले, की पवार वयाने ज्येष्ठ आहेत. आदरणीय आहेत. परंतु त्यांची राजकीय वाटचाल नेहमी संशयास्पद राहिली आहे. त्यामुळेच त्यांच्यावर नियतीने सूड उगवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सिंधुदुर्ग येथील ४०० कार्यकर्त्यांनी राजीनामा देऊन पवारांच्या नेतृत्वालाच नाकारले असल्याचेही रावते यांनी या वेळी सांगितले. अॅड. दिलीप सोपल हे सत्तेत असले तरीही ते सत्तेसोबत नसतात. ते नेहमीच विरोधकांना मदत करतात. यंदाच्या निवडणुकीत पवारांना त्याचा प्रत्यय येईल, असे सांगून रावते यांनी सोपल यांच्यावरही निशाणा साधला. सत्ताधाऱ्यांनी आचारसंहितेच्या नावाखाली घेतलेल्या कचखाऊ भूमिकेमुळे मराठवाडा आणि विदर्भातील शेतकरी जे सोसतो आहे, त्याचा राग त्यांच्या मनात आहे. महायुतीच्या सभांना उसळणारी गर्दी त्याचेच द्योतक आहे. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादीचा पराभव अटळ असल्याचेही ते म्हणाले.
पराभवाची धास्ती लागल्यामुळेच पवार फक्त मराठवाडय़ात बठका मारत आहेत. डॉ. पाटलांसाठी तर त्यांनी अधिक जोर लावला आहे. त्यांना ठाऊक आहे, मागच्या वेळी मिळालेला विजय यंदा सोपा नाही. यंदा उस्मानाबादवर पुन्हा शिवसेनेचा झेंडा फडकणार असल्याचेही रावते यांनी सांगितले.