राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांच्यावर टीका केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. शरद पवार यांनी पार्थ पवार अपरिपक्व असून, त्याच्या वक्तव्याला कवडीची किंमत देत नाही अशा शब्दांत बुधवारी फटकारलं. यावरुन आता वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि भाजपाचे नेते  निलेश राणे यांनीही आता या प्रकरणावर खोचक प्रतिक्रिया दिली आहे. पार्थ पवार यांच्यासंदर्भात प्रसारमाध्यमांसमोर मत प्रदर्शन करणाऱ्या शरद पवार यांना निलेश राणे यांनी व्यक केलेला हा राग नक्की कशाचा होता याचा खुलासा करावा अशी मागणी केली आहे. “पवार साहेब, हे जाहीर करा हा राग पार्थ ने राम मंदिरला समर्थन दिलं म्हणून होता की सुशांत प्रकरणात CBI चौकशीची मागणी केली म्हणून?,” असं ट्विट निलेश यांनी केलं आहे.

पवार नक्की काय म्हणाले?

सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी पार्थ पवार यांनी सीबीआय चौकशीची मागणी केलेली होती. यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी ‘माझा नातू पार्थ पवार हा अपरिपक्व असून, त्याच्या वक्तव्याला कवडीची किंमत देत नाही’ असं म्हटलं होतं. तसेच मुंबई, महाराष्ट्र पोलिसांवर पूर्ण विश्वास असल्याचं शरद पवार यांनी यावेळी म्हटलं. यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शरद पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

नक्की वाचा >> “उद्धव ठाकरे, तुम्हाला आणि तुमच्या मुलाला लवकरच राजीनामा द्यावा लागेल कारण…”

निलेश राणेंचा पवारांना प्रश्न

शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर निलेश राणे यांनी ट्विटवरुन प्रिक्रिया दिली आहे. स्वतःच्या नातवाला ज्या भाषेत पवार साहेबांनी फटकारले वाचून व ऐकून धक्का बसला, असं निलेश यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. “एक आजोबा आपल्या नातवाची लायकी जाहीररीत्या काढू शकतात हे पहिल्यांदाच बघितले. पवार साहेब हे जाहीर करा हा राग पार्थ ने राम मंदिरला समर्थन दिलं म्हणून होता की सुशांत प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी केली म्हणून?,” असा खोचक प्रश्न निलेश यांनी शरद पवार यांना विचारला आहे.

नितेश राणेंचाही टोला

बुधवारीच निलेश यांचे थोरले बंधू आणि भाजपा आमदार नितेश राणे यांनीही पवारांच्या वक्तव्यावर एक उपहासात्मक ट्विट केलं होतं. नितेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “आज परत सांगतो…पार्थ.. लंबी रेस का घोडा है !!! थांबू नकोस मित्रा”. नितेश राणे यांनी ट्विटमध्ये इतर कोणताही संदर्भ दिलेला नाही. मात्र शरद पवारांच्या वक्तव्यानंतर काही वेळातच त्यांनी हे ट्विट केलं.

पार्थ पवारांमुळे राष्ट्रवादीची पंचाईत

पार्थ पवार यांच्या भूमिके मुळे गेले तीन-चार दिवस राष्ट्रवादीची पंचाईत झाली होती. चित्रपट अभिनेता सुशांतसिंह याच्या आत्महत्येची सीबीआय चौकशीची मागणी भाजपकडून करण्यात येत असताना महाविकास आघाडी सरकारकडून मुंबई पोलीस हा तपास योग्यपणे करीत असल्याची ग्वाही दिली जात आहे. त्याच वेळी पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन सुशांतसिंहच्या आत्महत्येची सीबीआय चौकशीची मागणी करणारे पत्र दिले होते. या पत्राची प्रत आणि गृहमंत्र्यांना निवेदन देतानाचे छायाचित्र त्यांनी समाजमाध्यमावर प्रसिद्ध केले होते.

राम मंदिराचे समर्थन आणि शुभेच्छा

अयोध्येतील राममंदिर उभारण्याचे समर्थन करताना पार्थ पवार यांनी शुभेच्छा देताना ‘जय श्रीराम’ असा उल्लेख पत्रकात केला होता. ‘राम मंदिर उभारल्याने करोना विषाणू नष्ट होण्यास मदत होईल, असे काही लोकांना वाटत असावे’, असे विधान करीत शरद पवार यांनी भाजपवर टीका केली होती. शरद  पवार यांच्या भूमिकेला छेद देणारी भूमिका पार्थ यांनी मांडल्याने राष्ट्रवादीबाबत संशय निर्माण झाला होता. त्यावर ही पार्थ पवार यांची वैयक्तिक भूमिका असून, पक्षाची नाही, असे स्पष्टीकरण खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले होते.

राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

शरद पवार यांनी मात्र पार्थ यांना फटकारले. यावर काहीही भाष्य करण्यास पार्थ पवार यांनी नकार दिला. सायंकाळी अजित पवार यांनी पवारांच्या निवासस्थानी जाऊन चर्चा केली. शरद पवार आणि सुप्रिया सुळे या दोघांनीही पार्थच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतल्याने पवार कुटुंबीयांतील संबंधावरून राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा सुरू झाली.