19 October 2019

News Flash

शरद पवार दुष्काळाचे राजकारण करताहेत; महसूलमंत्री चंद्रकांत पाटलांचे टीकास्त्र

पवार यांनी नुकताच सोलापूर भागात दुष्काळाची पाहणी करून राज्यशासन दुष्काळाच्या प्रश्नांबाबत बाबत गांभीर्य नसल्याची टीका केली.

राज्य सरकारने ऑक्टोबर महिन्यापासूनच दुष्काळी उपाययोजना हाती घेतल्या आहेत. याची माहिती न घेता शरद पवार दुष्काळाचे राजकारण करीत आहेत, अशी टीका महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरात रविवारी केली, पाटील पत्रकार परिषेदेत बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य शासनाच्या दुष्काळी कामाचा पाढा वाचून पुर्वीच्या आघाडी शासनापेक्षा विद्यमान युती शासन कशाप्रकारे अधिक सक्षमपणे काम करीत आहे याचे विवेचन केले.

लोकसभा निवडणुकीपासून शरद पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यात सातत्याने जुगलबंदी सुरु आहे. ती अलीकडे बारामती लोकसभा निवडणुकीच्या निकालापर्यंत सुरु राहिली. आता निवडणूक सरली असली तरी दुष्काळाच्या प्रश्नावरून पुन्हा एकदा माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राज्याचे कृषीमंत्री यांच्यात नव्या वादाची फोडणी पडली आहे. पवार यांनी नुकताच सोलापूर भागात दुष्काळाची पाहणी करून राज्यशासन दुष्काळाच्या प्रश्नांबाबत बाबत गांभीर्य नसल्याची टीका केली. त्याला आज मंत्री पाटील यांनी कोल्हापुरात उत्तर दिले.

पवार यांच्यासारख्या जाणकार नेत्याने माहिती न घेता बोलण्याची आपणाला चिंता वाटत आहे, असा उल्लेख पाटील यांनी केला. ते म्हणाले, दुष्काळ निवारणात राज्य शासनाने कसलीही कसूर ठेवलेली नाही. ऑक्टोबर महिन्यापासूनच उपाययोजना केल्या आहेत. उलट, पूर्वीच्या शासनापेक्षा अधिक मदत केली जात आहे. आघाडी सरकारच्या काळात चाऱ्यासाठी लहान-मोठ्या जनावरांना अनुक्रमे २० व ४० रुपये प्रतिदिन दिले जायचे आता ही रक्कम ४५ आणि ९० रुपये इतकी वाढवली आहे. याचे आकडे उपलब्ध असताना पवार माहिती न घेता विधान करीत असल्याने त्यांच्यावर पाटील यांनी टीका केली. याचवेळी सगळ्यांनी मिळून दुष्काळाचा सामना करण्याची गरज असल्याच्या पवार यांच्या सुचनांचेही स्वागत केले जाईल, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

राज ठाकरे यांच्यावरही पाटील यांनी निशाणा साधला. समाज माध्यमातून टीका करणारी पोस्ट केल्याच्या कारणावरून मारहाण करण्याची त्यांची पद्धत चुकीची आहे, अशी टीका पाटील यांनी केली. तर, बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श घेऊन चालणारे राज ठाकरे बाळासाहेबांनी कधीही मदत न केलेल्या काँग्रेसच्या बाजूने कसे काय जात आहेत? असा सवालही त्यांनी केला.

मंत्रालयाच्या पायऱ्या आघाडी सरकारने बांधल्या होत्या. मात्र, त्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अडचणीच्या असल्याचा गृहविभागाने आणि त्रिसदस्यीय आयएएस अधिकाऱ्यांच्या समितीने अहवाल दिल्याने हटवण्यात येत असल्याचे स्पष्टीकरणही पाटील यांनी यावेळी दिले.

First Published on May 5, 2019 6:53 pm

Web Title: sharad pawar is doing politics of drought revenue minister chandrakant patils criticism