राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राज्यव्यापी दौऱ्याला आज (सोमवार) नाशिकमधुन सुरूवात झाली आहे. एकीकडे पक्षाचे अध्यक्ष नाशिकमध्ये दाखल झाले असताना, दुसरीकडे मात्र राष्ट्रावीदीचे नेते छगन भुजबळ यांची पवारांच्या बैठकीस अनुपस्थिती आहे. छगन भुजबळ हे मुंबईत असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे पवारांच्या नाशिक दौऱ्यापेक्षा जास्त भुजबळांच्या अनुपस्थितीचीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगताना दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी छगन भुजबळ राष्ट्रवादाली सोडचिठ्ठी देणार असल्याच्या व शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. यावरून अनेक तर्कवितर्क देखील लढवले जात होते. मात्र दोन दिवसांपूर्वीच भुजबळांनी आपण राष्ट्रवादीत असल्याचे स्पष्ट केल्याने या चर्चांना पुर्णविराम मिळाला होता.

सध्या छगन भुजबळ हे काँग्रेस -राष्ट्रवादीच्या जागा वाटप संदर्भातील बैठकीसाठी मुंबईत असल्याचे सांगितले जात आहे. तर त्यांचे प्रतिनिधी म्हणून समीर भुजबळ हे शरद पवारांच्या बैठकीस उपस्थित आहेत. मात्र, तरी देखील छगन भुजबळांची पवारांच्या दौऱ्यादरम्यानची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरत आहे. काही दिवसांपूर्वी खासदार सुप्रिया सुळे नाशिक दौऱ्यावर असतानाही भुजबळांची त्यावेळी असेलेली अनुपस्थिती सर्वांच्या लक्षात आली होती.

दुसरीकडे भाजपा-शिवसेना यांची युती जागा वाटपावरून फिस्कटल्यास नारायण राणे भाजपात तर छगन भुजबळ हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचेही राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.