News Flash

शरद पवारांमुळेच राष्ट्रवादी काँग्रेसला गळती लागली; उदयनराजेंचा आरोप

'..तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर वेळ आली नसती'

उदयनराजे आणि शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यामुळेच आज राष्ट्रवादी काँग्रेसला गळती लागली आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रसेच्या खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपात गेलेल्या उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले आहे. ‘बीबीसी मराठी’ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये पवारांनी वेळोवेळी त्यांच्याकडे अडचणी घेऊन जाणाऱ्या नेत्यांकडे दुर्लक्ष केल्याने आज मोठ्या प्रमाणावर लोकं पक्ष सोडून जात आहेत असं उदयनराजे म्हणाले.

शरद पवार यांनी पक्ष प्रमुख म्हणून वेळीच काही गोष्टींमध्ये लक्ष घातलं असतं तर आज चित्र वेगळं असतं असं मत उदयनराजे यांनी व्यक्त केले. ‘मी राजीनामा देण्याआधी पुण्यामध्ये शरद पवार साहेबांची भेट घेतली होती. त्यावेळेस आमच्यामध्ये चर्चा झाली. याआधीही अनेकदा मागील सहा सात वर्षांपासून अनेकवेळा मी हा (कामं न होण्याचा) विषय त्यांच्या कानावर घातला होता,’ असं उदयनराजे या मुलाखतीमध्ये म्हणाले. राष्ट्रवादीमधून निवडणुक लढण्याची आठवण सांगताना, ‘मी आईसाहेबांच्या सांगण्यावरुन पहिल्यांदा अपक्ष म्हणून लढण्याची तयारी ठेवली होती. त्यावेळेस ही जागा (सातारा) राष्ट्रवादीच्या वाटणीला होती. त्यांनी घरी येऊन आईसाहेबांशी बोलणं केलं. त्यानंतर शेवटी हो नाही हो नाही करत अखेर राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढवली. तेव्हा सुध्दा माझी अट एकच होती ती म्हणजे लोकांची कामं झाली पाहिजेत. मी याआधीही हेच बोललो आहे. मी शब्द मागे घेत नाही.’

काम न होण्याबरोबरच आपला अपमान झाल्याचेही उदयनराजे यांनी या मुलाखतीमध्ये सांगितले. ‘काम झाली पाहिजेत तसचं मला मान सन्मापूर्वक वागणूक पाहिजे. मला रेड कार्पेट द्या अशी माझी मागणी नाही. पण माझा अपमान झाला तर मी तो सहन करुन घेणार नाही. मी कोणाचा अपमान करत नाही आणि माझा कोणी अपमान केला तर तो कोणीही असला तरी मी मागेपुढे बघत नाही. अपमान झालाच तसेच कामांची यादी घेऊन घेऊन मी अगदी दमलो. एकही काम झालं नाही. कोणाच्या सांगण्यावरुन की काय ठाऊक नाही पण काम झालं नाही. आदरणीय शरद पवार यांनी पक्षप्रमुख म्हणून यात लक्ष घातलं असतं तर ही पक्षावर वेळ आली नसती. उगीचच आज जी मोठ्या प्रमाणावर लोकं जात आहेत, जी मोठी पक्षाला गळती लागली आहे त्याचं कारण मागे वळून पाहिलं तर हेच आहे,’ असं मत उदयनराजे यांनी व्यक्त केले.

खंडणीचे खोटे आरोप

आपल्यावर खंडणीचे खोटे आरोप लावण्यात आल्याचेही उदयनराजेंनी या मुलाखतीमध्ये सांगितले. ‘जिल्ह्यातील कामागारांसाठी भांडत असताना माझ्यावर त्याच जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ज्यांच्याकडे पवार साहेबांनी पक्षाची धुरा दिली त्यांनी माझ्यावरती थेट खंडणीचा आरोप ठेवला. मी एवढचं सांगितलं होतं की ज्या लोकांच्या एसईझेडमध्ये जमीनी गेल्या त्यांना नोकरीमध्ये प्राधान्य दिलं पाहिजे. त्या एसईझेडच्या नियमांमध्ये तशी अट आहे. तरी बाहेरचे लोकं भरले जातात. ज्यांच्यावर अन्याय होतो ते माझे मतदार आहेत. त्यांचा अधिकार हिरावून घेतला जातोय एवढचं सांगितलं. तसचं त्या कारखान्याच्या मालकाला असं झालं नाही तर माझ्यासारखं वाईट नाही एवढचं सांगितलं. त्यावरुन माझ्यावर खंडणीचा आरोप करण्यात आला. त्यातही गुन्हा फलटणमध्ये दाखल केला. करायचाच होता तर इथल्या पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करायला हवा होता. हे सगळं कसं घडलं याबद्दल मी अर्ज करुन विचारणा केली आहे. मुख्यमंत्र्यांकडे पण यासंदर्भात अर्ज करणार आहे. माझं चुकतं असेल तर मला शासन करा. पण हे खोटं जे काही पसरवलं जातयं ते चुकीचं आहे. फलटणचा डीव्हायएसपी माझ्यावरुन गुन्हा दाखल कोणत्या आधारावर हे मला काही कळत नाही,’ असं उदयनराजे म्हणाले.

इव्हीएमबद्दल शंका होती मात्र…

इव्हीएमबद्दल शंका होती मात्र सखोल विचार केल्यानंतर काम केलेल्यांना जनतेने निवडुन दिल्याचे लक्षात आले असं उदयनराजे म्हणाले. ‘मला इव्हीएमबद्दल शंका होती. मात्र लोकसभेचा निकाल लागल्यापासून मी मागील तीन वर्षांपासून विचार केला. की माझ्या जिल्ह्यात मागील दहा पंधरा वर्षांपासून जी कामं अडकून होती ती पूर्ण झाली. मी विरोधात असून सुद्धा दोन हजार कोटींची कामे माझ्या मतदारसंघात झाली. लोकांची कामं झाली तर लोकं निवडुन देतात,’ असं मत उदयनराजेंनी व्यक्त केले.

ठिणगी टाकणारे कोणी नाही..

शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि मी पुन्हा एका पक्षात असलो तरी आता आमच्यात ठिणगी टाकणारे कोणी नसल्याने सगळं सुरळीत चालणार असा विश्वास उद्यनराजेंनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2019 5:31 pm

Web Title: sharad pawar is responsible for people leaving ncp says udayanraje bhosale scsg 91
Next Stories
1 बापरे! पुढचे तीन दिवसही पावसाचेच – स्कायमेट
2 उदयनराजेंना समज यायला १५ वर्षे लागली : शरद पवार
3 “उदयनराजे दिवसा आणि रात्री कुठल्या अवस्थेत असतात हे अख्या महाराष्ट्राला माहिती”
Just Now!
X