News Flash

“शरद पवारांची बार मालकांबाबत कळकळ पाहून माझा कंठ दाटून आला”

भातखळकरांचा टोला; "मराठा समाज आशेने आपल्याकडे पाहतोय"

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार. (संग्रहित छायाचित्र। पीटीआय)

राज्यात करोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी आणि रुग्णासंख्या नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केलेले आहेत. त्यामुळे अत्यावश्यक सेवा आणि जीवनावश्यक वस्तुंची दुकानं वगळता सर्व व्यवहारांना खिळ बसली आहे. हॉटेल व्यवसाय आणि बार यांनाही याची झळ बसली असून, या संदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवलं. त्या पत्रावरून भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी पवारांना टोला लगावला आहे.

पहिल्या लाटेतून सावरणाऱ्या महाराष्ट्राला दुसऱ्या लाटेनं पुन्हा मगरमिठी मारली आहे. फेब्रुवारीपासून राज्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरू असून, राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे जवळपास सर्वच आर्थिक व्यवहारांना खिळ बसली आहे. हॉटेल व्यावसायिक आणि बार चालकांनाही याची झळ बसली असून, यासंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं होतं. त्यावरून भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी पवारांवर निशाणा साधला आहे.

अतुल भातखळकर यांनी शरद पवारांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेलं ट्विट केलं असून, टोला लगावला आहे. “शरद पवार साहेबांनी बारमालकांना वीज बिलात सवलत द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. याच कळकळीने आपण शेतकऱ्यांसाठीही एखादे पत्र पाठवाल अशी अपेक्षा आहे. १०० कोटींच्या बोजाने दबलेल्या बार मालकांबाबत आपली कळकळ पाहून माझा कंठ दाटून आला आहे, हे मी नमूद करू इच्छितो,” असा टोला भातखळकर यांनी शरद पवारांना लगावला आहे.

“मराठा समाज आशेने आपल्याकडे पाहतोय”

भातखळकर यांनी आणखी एक ट्विट केलं असून, शरद पवारांचं मराठा आरक्षणाकडे लक्ष वेधलं आहे. “शरद पवार साहेब हॉस्पिटलमधून सकुशल आल्याबद्दल आपले अभिनंदन. प्रकृती सावरल्यावर आपण सर्वप्रथम बार मालकांसाठी आवाज उठवलात, बहुधा मराठा आरक्षणाचे वृत्त आपल्या कानावर आले नसावे. बार मालकांच्या प्रकरणातून वेळ मिळाला, तर थोडं तिथेही लक्ष द्या. मराठा समाज आशेने आपल्याकडे पाहतोय,” असं भातखळकर यांनी म्हटलं आहे.

शरद पवारांनी पत्रात काय म्हटलंय?

“एफएल-३ परवानाधारक हॉटेल-परमिट बार मालकांना अबकारी कराचा भरणा किमान ४ हप्त्यांमध्ये करण्याची सवलत द्यावी. वीज बिलात सवलत मिळावी तसेच मालमत्ता करात सूट मिळावी आणि केंद्रीय अर्थ मंत्रालयाने आपतकालीन पतरेखा हमी योजना क्र. १.० व २.० अंमलात आणून सदर योजनेला दिनांक ३० जून २०२१ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. तसेच, पर्यटन-आदरातिथ्य व्यवसायांकरिता क्र. ३.० योजना जाहीर केली आहे. महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्यात देखील उद्योग –व्यवसायाला संजीवनी देणारी, रोजगाराला प्रोत्साहन देणारी योजना राबवावी,” शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलेलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 8, 2021 9:20 am

Web Title: sharad pawar letter to uddhav thackeray hotel bar restaurant atul bhatkhalkar bmh 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 महाराष्ट्रातील ऑक्सिजन संशोधकाचा चेन्नईत ऑक्सिजनअभावी दुर्दैवी मृत्यू!
2 राष्ट्रभक्त सरकार असते, तर राजकीय फायद्या-तोट्याचा विचार न करता…; शिवसेनेचा मोदींना ‘डोस’
3 बीडमध्ये अडीचशे खाटांचे कोविड केंद्र
Just Now!
X