News Flash

करमाळय़ातील पवारांच्या बैठकीकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दाखविली पाठ

विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या ऐवजी स्वत: शरद पवार यांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे.

माढा लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या ऐवजी स्वत: शरद पवार यांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे.

सोलापूर : माढा लोकसभा निवडणुकीत स्वत:ची उमेदवारी पुढे आणल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी मतदारसंघात बैठकांवर भर देत शुक्रवारी करमाळय़ास भेट दिली. त्यांच्या उपस्थितीत झालेल्या पक्षाच्या बैठकीस करमाळय़ाचा एकटा बागल गट वगळता मतदारसंघातील कोणीही बडे नेते हजर नव्हते. पवार यांनी करमाळय़ात कमलादेवी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर पक्षाच्या स्थानिक नेत्या रश्मी बागल यांच्या निवासस्थानी भोजन घेतले.

माढा लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या ऐवजी स्वत: शरद पवार यांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर पक्षातील वाढती गटबाजी थोपविण्यासाठी त्यांनी मतदारसंघात संपर्क वाढविला आहे. गेल्या आठवडय़ात त्यांनी माढा तालुक्यात पिंपळनेर येथे तेथील राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे यांच्या गावी बैठक घेतली होती. त्यानंतर पुन्हा शुक्रवारी त्यांनी करमाळा व अकलूजला भेटी देऊन बैठका घेतल्या. करमाळय़ातील बैठकीकडे संपूर्ण सोलापूर जिल्हय़ाचे लक्ष वेधले होते. कारण तेथे पक्षांतर्गत मोठी गटबाजी दिसून येते. या पाश्र्वभूमीवर पवार यांच्या या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले होते. प्रत्यक्षात मतदारसंघातील अन्य बडय़ा मंडळींनी पाठ फिरविल्यामुळे ही बैठक निष्फळ ठरल्याचे मानले जाते. आमदार बबनराव शिंदे यांच्या माढा तालुक्यातील कुर्डूवाडीसह सुमारे एक लाख मतदारसंख्या असलेला भाग करमाळा विधानसभा मतदारसंघाला जोडलेला आहे. आमदार शिंदे हे आजच्या बैठकीला गैरहजर राहिले. याच करमाळय़ातून त्यांचे बंधू तथा भाजप पुरस्कृत महाआघाडीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सांभाळणारे संजय शिंदे हे विधानसभेची जोरदार तयारी करीत आहेत. परंतु पवार यांच्या माढा लोकसभा उमेदवारीमुळे संजय शिंदे यांची अडचण झाली आहे.  दुसरीकडे करमाळय़ात मोहिते-पाटील गटाचे अस्तित्व कायम आहे. हा गटदेखील बैठकीपासून दूर राहिल्याचे दिसून आले.

कमलादेवी मंदिराजवळील मंगल कार्यालयात झालेल्या बैठकीत पवार यांच्यासमोर बागल गटाने शक्तिप्रदर्शन घडविले. या वेळी पवार यांनी मराठा व धनगर आरक्षणासह शेतकरी कर्जमाफी, नोटाबंदी आदी मुद्यांवर भाजप सरकारने सर्वाची फसवणूक केल्याचा आरोप केला. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होण्यापूर्वी त्यांना कोणी साधे ओळखत तरी होते काय, असा सवाल बैठकीत उपस्थित शेतकरी व कार्यकर्त्यांना विचारला. भुईमुगाच्या शेंगा नेमक्या कशा उगवतात, याची माहिती फडणवीस यांना होती काय, असाही टोला पवार यांनी लगावला.

धनगर आरक्षण अन् मतदान

देशात व राज्यात सत्तेवर येताच मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत धनगर समाजाच्या आरक्षणाचा निर्णय घेण्याचे आश्वासन भाजपने दिले होते. परंतु भाजपला त्याचा विसर पडला आहे. त्याकडे लक्ष वेधत करमाळा कृषिउत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रा. शंकरराव बंडगर यांनी धनगर समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी शरद पवार यांना साकडे घातले. त्यावर पवार यांनी, ‘तुम्ही भाजपला मतदान करता आणि आरक्षण आम्हाला मागता, हे बरं नव्हं’ अशा मिस्कील शब्दांत उत्तर दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 2, 2019 3:50 am

Web Title: sharad pawar madha vijaysinh mohite patil lok sabha election
Next Stories
1 भावी वधू पळून गेल्याने तरुणाची आत्महत्या
2 गडचिरोलीत दुर्मिळ ‘काळा गिधाड’
3 शेतकरी पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या
Just Now!
X