13 December 2019

News Flash

पूरग्रस्तांना घरे बांधून द्यायला हवीत – शरद पवार

खासदार पवार यांनी सांगलीतील पूरग्रस्त भागाला भेट दिली.

संग्रहित छायाचित्र

लोकांना महापुरामुळे होत असलेला त्रास सांगणे म्हणजे राजकारण नव्हे, असे सांगत पूरग्रस्तांना १०-१५ हजार रुपये देण्यापेक्षा त्यांना विश्वासात घेऊन घरे बांधून द्यायला हवीत, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी शनिवारी सायंकाळी सांगलीत पत्रकार परिषदेत सांगितले.

खासदार पवार यांनी सांगलीतील पूरग्रस्त भागाला भेट दिली. पलूस तालुक्यातील विविध पूरग्रस्त भागाला भेटी दिल्यानंतर सायंकाळी सांगलीत त्यांनी पहाणी केली. पवार म्हणाले की, पुराचे पाणी आज ना उद्या उतरेल, पण त्यानंतर काय?  पूरग्रस्तांच्या हाताला आता काम देणं ही सरकारची जबाबदारी आहे. रोजगार हमी किंवा तत्सम योजनांवर लोकांना पाठवून त्यांच्या हाताला काम देणं गरजेचं आहे. पूरग्रस्तांना नुकसान भरपाई तातडीने द्यावी.

पूरग्रस्तांवर अभूतपूर्व संकट कोसळले आहे. त्यांना लवकरात लवकर बाहेर काढणे गरजेचे आहे. राज्य सरकारला केंद्र सरकारने मदत करण्याची गरज आहे. सांगलीतील पाणी कमी करण्यासाठी कर्नाटक सरकारने पुढाकार घेतला पाहिजे. तरच सांगलीतील पूरस्थिती आटोक्यात येऊ शकेल.

राज्याचे प्रमुख आणि प्रशासनाचे प्रमुख हे सर्व ठीक चालले आहे, असं समजून चाललेले आहेत. काही जण तर सेल्फी काढण्यासाठी जात असतील, तर ही स्थिती लवकर ठीक होईल, असं मला वाटत नाही, अशा शब्दात पवार यांनी महाजनांचं नाव न घेता टीका केली.

First Published on August 12, 2019 12:53 am

Web Title: sharad pawar maharashtra floods heavy rainfall mpg 94
Just Now!
X