मोदीभेटीच्या वादावर पवार यांचा ‘खुलासा’
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि माझ्या भेटीची चर्चा होते, पण मी काही  पाकिस्तान किंवा चीनमधील कोणाला भेटलो नाही. देशातील सर्वच राज्यातील मुख्यमंत्री आणि लोकप्रतिनिधींना जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी मी भेटत असतो आणि कर्तव्य पार पाडत असतो, असे सांगत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी शनिवारी ठाण्यात मोदी भेटीचे एकप्रकारे समर्थनच केले.
घोडबंदर येथील ढोकाळी परिसरात उभारण्यात आलेल्या मिनी क्रीडा संकुलाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते शनिवारी झाले. त्या वेळी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे स्थानिक नेते, नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमात पवार बोलत होते.
लोकप्रतिनिधी कोणत्या पक्षाचा आहे, याचा विचार मी करत नाही. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांच्या भेटी घेत असतो. केंद्रीय मंत्री म्हणून स्वत: ची जबाबदारी पार पाडत असतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सात महापालिका असलेला ठाणे देशातील सर्वात मोठा जिल्हा आहे. या जिल्ह्य़ातील प्रश्न वेगवेगळे आहेत. येत्या दीड – दोन महिन्यांत निवडणुका होणार आहेत. त्यामुळे हे प्रश्न तोपर्यंत सुटणार नाहीत. या निवडणुका झाल्यानंतर जे लोकप्रतिनिधी असतील, त्यांची अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात येईल. जिल्ह्य़ातील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी केंद्राची तसेच वेळ आल्यास जागतिक बँकेची मदत घेण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी या वेळी दिले. ही वास्तू महापालिकेच्या खर्चातून उभी राहिली असून त्यासाठी खासदार संजीव नाईक यांनी सुमारे तीन ते चार कोटी रुपयांचा निधी दिल्याचा उल्लेख शिवसेना नेत्यांच्या भाषणांतून करण्यात येत होता. याच मुद्दय़ावरून ही वास्तू दूध आहे, असे समजा. महापालिकेने दूध दिले. त्याचा लाभ ठाणेकरांना होईल. पण, या दुधात खासदार नाईक यांनी पाच कोटी रुपयांचे केशर टाकले असून त्यातून केशरयुक्त दूध तयार झाले आहे. त्याचा फायदा ठाणेकरांना चांगल्याप्रकारे होईल, असा टोला शरद पवार यांनी शिवसेनेला लगावला.
या संकुलाचे श्रेय घेण्यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी यांमध्ये फलकयुद्धही झाले. शहरात तसेच क्रीडा संकुलाच्या परिसरात दोन्ही पक्षांचे  मोठे फलक लागले होते. नेत्यांची भाषणे सुरू होताच त्यांचे कार्यकर्ते घोषणाबाजी करीत होते. त्यामुळे कार्यक्रम परिसरात तणावाचे वातावरण होते.

‘बाळासाहेबांप्रमाणेच पवार आदरणीय’
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे शरद पवार हेही आम्हांला आदरणीय आहेत. त्यामुळे या कार्यक्रमात त्यांचा अनादर होऊ नये, अशी आमची भूमिका होती, असे शिवसेनेचे ठाणे जिल्हा संपर्क नेते आमदार एकनाथ शिंदे या प्रसंगी म्हणाले.