राज्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तसेच राज्यातील एकूण परिस्थितीबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी तत्काळ लक्ष घालण्याचे आश्वासन पवारांना दिले. यावेळी विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, आमदार राणा जगजित सिंह, आमदार राजेश टोपे आदींसह दुष्काळी भागातील काही प्रतिनिधी उपस्थित होते.

सोलापूर, सातारा, अहमदनगर आणि बीड जिल्ह्यातील काही गावांना शरद पवारांनी नुकत्याच भेटी देत तिथल्या दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. येथील जनतेच्या समस्या अडचणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर बैठकीदरम्यान मांडल्या.

पिण्याच्या पाण्याच्या समस्येबद्दल सांगताना पवार म्हणाले, या भागात पिण्याचे पाणी पुरेसे आणि वेळेवर येत नाही. कमी अधिक प्रमाणात येणाऱे पाणी, अशुद्ध पाणी पुरवठा तसेच जनावरांसाठीही पाणी नसल्याचे त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. टँकरसाठी पाणी भरताना वीजेची समस्यासुद्धा मोठी असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय बीड जिल्ह्यातील चारा संघटनेने आंदोलनाचा पवित्रा घेतल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

छावण्या सुरू झाल्या तरी चारा न मिळाल्यामुळे लाखो रुपयांचे कर्ज डोक्यावर असल्यामुळे व्याजाचा भुर्दंड सहन करावा लागत असल्याने छावण्या बंद करण्याचा त्यांनी निर्णय चालकांनी घेतला आहे. चारा छावण्यांमध्ये केवळ ऊसाचा चारा दिला जात आहे. जनावरांचे आकडेवारी रोजच्या रोज कळवणे, अशा बऱ्याच समस्यांमुळे चारा छावणी चालकांना त्रास होत आह. प्रती जनावर ९० रुपये इतके चारा छावणी चालवण्यासाठी असणारे अनुदान अपुरे असल्याचे देखील शरद पवारांनी निदर्शनास आणले. त्यावर आता हे अनुदान १०० रुपये प्रती जनावर करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. तसेच हे अनुदान १२० रुपयांपर्यंत नेण्याचे प्रयत्न सुरु असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

केंद्र शासनाने अन्न सुरक्षा कायदा लागू केल्यानंतर सुद्धा दुष्काळी भागातील जनतेला रेशन कार्डवर अन्नधान्य मिळत नसल्याची तक्रार शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. साधारणः बीपीएल अंतर्गत ७ कोटी लाभार्थ्यांना अन्नधान्य देण्याचा शासनाचा मानस असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मात्र, दुष्काळी परिस्थितीमध्ये बीपीएल, एपीएल आणि सर्वांनाच अत्यल्प दरात आणि त्यावरील घटकांना परवडेल अशा दरामध्ये सरसकट धान्य देण्यात यावे अशी विनंतीही पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

बीड जिल्ह्यातील धनगर समाजाच्या प्रतिनिधींनी मांडलेल्या अडचणी सांगताना शरद पवार म्हणाले, शेळ्या-मेंढ्यांचा सुद्धा जनावरांच्या छावणीप्रमाणे विचार करण्यात अशी धनगर समाजाची मागणी आहे. यावर या गोष्टींकडे देखील लक्ष पुरवू असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.