राज्यात २०१९ मध्ये अर्थात मागील वर्षी विधानसभा निवडणूक झाली. निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला होता. आरोपांची धुळवड सुरू होती. राज्यातील राजकीय चित्र चित्र एकतर्फी असल्यासारखीचं स्थिती होती. पण १८ ऑक्टोबरला झालेल्या पावसात हे चित्र पार धुवून निघालं. राजकीय आडाखे वाहून गेले. साताऱ्यात झालेल्या शरद पवार यांच्या या वादळी सभेला आज वर्षपूर्ण होत आहे. या सभेच्या आठवणीला राष्ट्रवादी काँग्रेसकडून उजाळा दिला जात असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हेमंत टकले यांनी खास पवारांविषयी भावना व्यक्त केल्या आहेत.

डोंगर कधीच म्हातारे होत नाहीत…

आयुष्यभर पावसाळे खांद्यावर घेऊन ह्या अवलियाची वाटचाल सुरूच आहे.
थकणं-भागणं हे शब्दच त्याला माहीत नाहीत.
तारुण्याच्या उंबरठ्यावर नातं जोडलं त्यानं पाण्याशी, पावसाशी, मातीशी आणि माणसांशीही.
निसर्गानं चकवा द्यावा, पावसानं फसवावं, कधी धुवांधार बरसात, तर कधी गायब व्हावं…
हा खेळ त्यानं केव्हांच हेरला होता आणि मग सुरू झाला एक संघर्ष बळीराजासाठी…
त्यानं शेतात सोनं पिकवावं… पण बाजार फिरावा.
मात करायची होती ह्या अस्मानी आणि सुलतानी संकटांशी.
आयुष्याची आखणीच केली. मशागत केली, मेहनतीनं माणसं जोडत निघाली स्वारी.
अगदी बारामतीच्या शेततळ्यापासून साठ पावसाळ्यांपूर्वी सुरू झालेला हा अथक प्रवास आहे एका वादळाचा.
होय, त्या वादळाचं नाव आहे ‘शरदचंद्र पवार’!
अनेक संकटं झेलली, पण समाजाशी घट्ट विणलेली सामीलकी अधिकच बहरत गेली.
उन्हा-पावसात, वादळवाऱ्यात, झंझावातात आणि नीरव शांततेतही त्यांनी कायम जपला तो शेवटचा माणूस.
म्हणून तर अवघ्या जिवाचे कान करून प्रचंड जनसमुदाय उभा होता आतुरतेने त्या चिंब भिजवणाऱ्या पावसात…
शब्द गेला तुमची साथ देण्याचा
होय, ह्या गौरीशिखरानं
आवतण दिलंय सर्वांना
साथसोबत करण्याचं…
अनेकांच्या आयुष्यातला हाच तो टर्निंग पॉइंट, ज्यांनी प्रत्यक्ष अनुभवला, वाहिन्यांवरून पाहिला, वर्तमानपत्रात झळकला.
कारण त्यांचं बोलणं शंभर नंबरी आणि दिलासाही भरभक्कम.
आजही संकट आलंय
परतीच्या पावसानं शेतीच वाहून गेलीय
त्याच्या पाठीवर आजही त्यांचाच हात असणार आहे
ते देणार आहेत तुम्हाला धीर
आणि करणार आहेत तयार झुंज देण्यासाठी
होय, ८० व्या पावसाळ्यात
हात पसरून आकाशाकडे मागतो आहे समृद्धी बळीराजासाठी
आणि खरंच त्याच्या प्रार्थनेला नैतिकतेचं बळ प्राप्त झालेलं आहे
अशीच आव्हाने स्वीकारत हा ऋषी मार्गस्थ होणार आहे
होय, कारण
डोंगर कधीच म्हातारे होत नाहीत.

या सभेची दखल घेतल्याशिवाय २०१९मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीची चर्चा पूर्ण होत नाही. त्या घटनेनं राज्यातील राजकीय चित्र बदलून टाकलं. वारं फिरलं अन् राज्यात अशक्य असं राजकीय समीकरण जुळून आलं. पण, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट घडली, ती गलितगात्र झालेल्या राष्ट्रवादीला ही सभा बारा हत्तीचं बळ देऊन गेली.